मुंबई : क्रिकेट विश्वचषकाच्या उपांत्य सामन्याला अवघे काही तास शिल्लक असतानाच भारतीय क्रिकेट संघाला कशा प्रकारे हा सामना खिशात टाकता येईल याचा कानमंत्र अनेक माजी खेळाडू कर्णधार विराट कोहलीला देताना दिसत आहेत. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचाही समावेश आहे. न्यूझीलंडसोबतच्या उपांत्य सामन्याच्या पूर्वी माध्यमांशी संवाद साधताना सचिनने 'प्लेइंग इलेव्हन'साठी काही खेळाडूंच्या नावाला प्राधान्य दिलं.
सचिनने रविंद्र जडेजा आणि मोहम्मद शामी या खेळाडूंच्या नावाला पसंती दिली. संघात रविंद्र जडेजाची वर्णी लागावी असं मत सचिनने मांडलं. न्यूझीलंडच्या संघासोबत खेलताना फिरकी गोलंदाजांची गरज पाहता रविंद्र जडेजाला संघात स्थान दिलं जावं, असा सल्ला त्याने दिला.
'इंडिया टुडे'शी संवाद साधताना सचिनने उपांत्य सामन्यासाठी त्याच्या नजरेतील प्लेइंग इलेव्हनचा उलगडा केला. 'जडेजा एक उत्तम पर्याय आहे. जो मी संघ व्यवस्थापनासमोर मांडू इच्छितो. दिनेश कार्तिक सातव्या क्रमांकावर फलंदाजी करणार असेल तर, इथे शक्यता ही आहे की डावखुरा गोलंदाज रविंद्र जडेजा संघासठी एक उत्तम पर्याय ठरु शकतो. अशा मोठ्या सामन्यांमध्ये तुम्हाला एका आधाराची गरज असते. कारण आपण फक्त पाच गोलंदाजांच्या बळावर खेळत आहोत', असं सचिन म्हणाला.
मोहम्मद शामीला आतापर्यंत विराटने दिलेल्या संधी पाहता त्याला खेळवण्यासाठी खुद्द विराटही उत्साही असल्याचं सचिन म्हणाला. 'मी शामीला खेळवण्याचं पूर्ण समर्थन करतो. कारण, वेस्ट इंडिजच्या संघाविरोधात त्याने या ठिकाणी चांगली कामगिरी केली होती', असंही त्याने सांगितलं. तेव्हा आता सचिनने दिलेला हा सल्ला विराट सत्यात उतरवतो का, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.