नेमबाजीत मनीष नरवालची रौप्य पदकाला गवसणी, पॅरालिम्पिकमध्ये भारताला चौथ पदक

मनीष नरवालने पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये रौप्य पदक जिंकलं आहे. 

Updated: Aug 30, 2024, 06:45 PM IST
नेमबाजीत मनीष नरवालची रौप्य पदकाला गवसणी, पॅरालिम्पिकमध्ये भारताला चौथ पदक  title=
(Photo Credit : Social Media)

Manish Narwal Won Silver In Paralympics 2024 : ऑलिम्पिक 2024 नंतर आता पॅरिसमध्ये पॅरालिम्पिक 2024 चं आयोजन करण्यात आलं आहे. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस असून एकाच दिवशी भारतीय नेमबाजांच्या कामगिरीने भारताच्या खात्यात पदकांचा पाऊस पडला आहे. थोड्यावेळापूर्वी महिला नेमबाज अवनी लेखरा हिने सुवर्ण तर मोना अग्रवाल हिने कांस्य पदकाला गवसणी घातली होती. तर आता मनीष नरवालने पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये रौप्य पदक जिंकलं आहे. यामुळे आता पॅरालिम्पिक 2024 भारताच्या पदकांची संख्या चार झाली आहे. 

पॅरिसमध्ये पॅरालिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये भारताचा नेमबाज मनीष नरवालने सहभाग घेतला होता. पहिल्या फेरीत त्याची सुरुवात चांगली झाली नाही. त्याच्या पहिल्या सीरिजच्या 5 शॉटची सुरुवात 8.1 च्या शॉटने झाली मात्र त्याने नंतर 10.5, 9.8, 10.0 आणि 10.3 च्या शॉट्ससह सिरीज रिकव्हर केली. पहिल्या मालिकेनंतर 48.7 च्या स्कोअरसह तो सहाव्या स्थानावर राहिला. पदक जिंकण्याच्या मार्गावर असताना मनीषने आपल्या कामगिरीत सुधारणा केली आणि 97.2 च्या एकत्रित गुणांसह मनीष पाचव्या स्थानावर पोहोचला. एलिमिनेशन राऊंडमध्ये, मनीष चांगल्या लयीत आला आणि मग पहिल्या एलिमिनेशन फेरीनंतर तो चौथ्या स्थानावर पोहोचला जिथे त्याने 10.1 आणि 10.4 गुण मिळवले. दुसऱ्या एलिमिनेशननंतर तो रौप्य पदकाच्या स्थानावर होता त्याने 137.6 चा ऐकूण स्कोअर केला. 

हेही वाचा : पॅरालिम्पिकमध्ये नेमबाज अवनी लेखराला सुवर्णपदक, तर मोना अगरवालची कांस्य पदकाला गवसणी

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये मिळवलं होतं सुवर्णपदक : 

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये भारताला रौप्य पदक जिंकवून देणाऱ्या 22 वर्षीय मनीष नरवालने 2020 च्या टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली होती. मनीषने टोकियो येथे 50 मीटर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. 

कोण आहे मनीष नरवाल? 

मनीष नरवाल हा 22 वर्षांचा असून त्याचा उजवा हात लहानपणापासून नीट काम करत नव्हता. कुटुंबाने मनीषचा हात बरा व्हावा यासाठी अनेक डॉक्टर हॉस्पिटलच्या फेऱ्या मारल्या परंतू  त्यांना यश आले नाही. मनीष मोठा झाल्यावर त्याला फुटबॉल खेळायला आवडायचा मात्र एकदा फुटबॉल खेळत असताना त्याच्या उजव्या हाताला दुखापत झाली. रक्तही वाहत होतं. त्यानंतर मनीषच्या काळजीपोटी त्याच्या आईवडिलांनी त्याला फुटबॉल खेळायला पाठवण्यास नकार दिला. एकेदिवशी मनीषच्या वडिलांच्या मित्राने त्याला शूटिंग विषयी सांगितले, त्यानंतर मनीषने ट्रेनिंगला सुरुवात केली मग त्याने कधीच मागे वळून पहिले नाही.