Manipur Violence Players Home Burn: भारताच्या ईशान्येकडील मणीपूर राज्य मागील 3 महिन्यांपासून दोन समाजांमधील हिंसाचाराच्या झळा सोसत आहे. येथील कुकी आणि मैतेई समाजामध्ये सुरु असलेल्या संघर्षामुळे राज्यामध्ये अशांतता आहे. मागील 3 महिन्यांमध्ये अनेकदा वेगवेगळ्या गटांमध्ये हिंसक झटापटी झाल्या आहेत. 3 मे पासून सुरु झालेल्या या हिंसाचारामुळे सर्वसामान्यांचं जीवन विस्कळीत झालं आहे. या हिंसाचारामध्ये 150 हून अधिक जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. हजारो लोक जखमी झाले असून शेकडो घरं जाळून टाकण्यात आली आहेत. तोफडोड आणि आग लावण्याच्या घटनांमध्ये कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे.
मणिपूरमधील हिसांचारामुळे हजारो लोकांना विस्थापित व्हावं लागलं आहे. या हिंसाचाराचा फटका बसलेल्यांमध्ये भारतीय फुटबॉलपटू चिंगलेनसाना सिंहलाही बसला आहे. चिंगलेनसानाच्या कुटुंबाला या हिंसाचाराला फटका बसला आहे. चिंगलेनसानाच्या घराला समाजकंटकांनी आग लावली. त्याचं संपूर्ण गाव हल्लेखोरांनी जळून टाकलं आहे. चिंगलेनसानाचं कुटुंबीय कसेबसे या हल्ल्यामधून जीव मुठीत धरुन पळाल्याने वाचले. हा संपूर्ण घटनाक्रम घडला तेव्हा चिंगलेनसाना हैदराबाद एफसीच्या संघाबरोबर केरळमधील कोझिकोडमध्ये होता. चिंगलेनसाना हा चुराचांदपूर जिल्ह्यातील खुमुजामा लेकेईमध्ये वास्तव्यास आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर चिंगलेनसानाने मणिपूर हिंसाचारासंदर्भात आपलं मत व्यक्त केलं आहे. भावनिक प्रतिक्रिया देताना चिंगलेनसानाने पीटीआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधला. "मी ऐकलं की आमचं घर जाळून टाकलं आहे. त्यानंतर चुंराचांदपुरमध्ये मी फुटबॉलसाठी जे टर्फ मैदान बनवलं होतं ते सुद्धा जाळून टाकण्यात आलं आहे. हे फारच हृदयद्रावक आहे. मी तेथील तरुण खेळाडूंसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देण्याचं मोठं स्वप्न पाहिलं होतं. मात्र हे स्वप्नही माझ्याकडून हिरावून घेण्यात आलं. नशिबाने माझं कुटुंब या हिंसेमधून वाचलं आणि त्यांना आता आश्रयितांसाठीच्या शिबिरामध्ये ठेवण्यात आलं आहे," असं चिंगलेनसाना म्हणाला.
हिंसाचाराच्या बातम्या पाहून चिंगलेनसाना फार चिंतेत होता. त्याने गावावर हल्ला झाल्याची बातमी पाहिल्यानंतर तातडीने कुटुंबियांना फोन केला. मात्र कोणीच फोन उचलला नाही. चिंगलेनसानाला त्याचं घर जळून खाक झाल्याची माहिती मिळाली. थोडा वेळ वारंवार फोन केल्यानंतर त्याला आईशी फोनवर बोलता आलं. त्याची आई फोनवर रडत होती. मागून गोळ्यांचा आवजही येत होता. हे सारं ऐकून चिंगलेनसानाने तातडीने मणिपूरला जाण्याचा निर्णय घेतला.
27 वर्षीय चिंगलेनसानाने भारतीय संघासाठी 11 सामने खेळले आहेत. तो भारतीय संघांमध्ये बचावफळीमध्ये म्हणजेच डिफेंडर म्हणून खेळतो. तो सेंटर बॅक पोझिशनलाही खेळतो. चिंगलेनसानाने 25 मार्च 2021 रोजी मालदीवच्या संघाविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केलं होतं. चिंगलेनसाना सध्या त्याच्या कुटुंबाबरोबर शिबिरात राहत असला तरी फार समाधानी आहे. या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर चिंगलेनसानाने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून तात्पुरती माघार घेतली आहे.