जयपूर : कृष्णप्पा गौतमच्या धडाकेबाज खेळीमुळे राजस्थाननं मुंबईचा पराभव केला आहे. शेवटच्या २ ओव्हरमध्ये २८ रनची आवश्यकता असताना राजस्थाननं २ बॉल राखून विजय मिळवला. कृष्णप्पा गौतमनं ११ बॉलमध्ये ३३ रनची खेळी केली. यामध्ये ४ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता. सुरुवातीला राजस्थानला १४ बॉलमध्ये ३८ तर १२ बॉलमध्ये २८ रनची आवश्यकता असताना १९वी ओव्हर बुमराहनं टाकली. बुमराहच्या या ओव्हरला राजस्थाननं १८ रन काढल्या. यानंतर शेवटच्या ओव्हरला १० रनची आवश्यकता असताना गौतमनं हार्दिक पांड्याच्या दुसऱ्या बॉलला फोर आणि चौथ्या बॉलला सिक्स लगावली आणि राजस्थानला मॅच जिंकवून दिली.
मुंबईनं ठेवलेल्या १६८ रनचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. राजस्थानचा स्कोअर १४ असताना राहुल त्रिपाठी आणि ३८ असताना अजिंक्य रहाणे आऊट झाला. यानंतर संजू सॅमसन आणि बेन स्टोक्सनं राजस्थानचा डाव सावरला. सॅमसननं ३९ बॉलमध्ये ५२ आणि स्टोक्सनं २७ बॉलमध्ये ४० रन केल्या. या दोघांची विकेट गेल्यानंतर राजस्थानच्या पडझडीला सुरुवात झाली पण गौतमनं मुंबईच्या हातातला विजय खेचून आणला.
कृष्णप्पा गौतमला राजस्थाननं लिलावात ६.२० कोटी रुपयांना विकत घेतलं. कृष्णप्पा गौतमला त्याच्या बेस प्राईसच्या तब्बल ३१ पट जास्त रक्कम मिळाली. गौतमवर सुरुवातीला बंगळुरुनं बोली लावली होती. यानंतर कोलकाता आणि मुंबईही या स्पर्धेत उतरल्या होत्या. पण शेवटी राजस्थाननं गौतमला विकत घेतलं. लिलावामध्ये गौतमची बेस प्राईस २० लाख रुपये होती पण त्याची ६.२० कोटी रुपयांना विक्री झाली.
कृष्णप्पा गौतम कर्नाटककडून रणजी क्रिकेट खेळतो. घरगुती क्रिकेटमध्ये गौतमनं ३४ विकेट घेतल्यामुळे प्रत्येक टीमलाच गौतम हवा होता. त्यामुळे त्याच्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात बोली लागली. मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये वादळी खेळी करुन गौतमनं त्याच्यावर लागलेली एवढी मोठी बोली योग्य असल्याचं सिद्ध केलं.