श्रीलंकेविरुद्धच्या शतकाचा विराटला फायदा, जडेजाचं नुकसान

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये शतक झळकावणाऱ्या विराट कोहलीला फायदा झाला आहे.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Nov 21, 2017, 05:54 PM IST
श्रीलंकेविरुद्धच्या शतकाचा विराटला फायदा, जडेजाचं नुकसान title=

कोलकाता : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये शतक झळकावणाऱ्या विराट कोहलीला फायदा झाला आहे. आयसीसीच्या टेस्ट रॅकिंगमध्ये विराट कोहली पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर पाचव्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर गेला आहे. तर रवींद्र जडेजा दुसऱ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. कोहलीनं श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये नाबाद शतक मारलं होतं. याचबरोबर विराटनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० शतकंही पूर्ण केली. वनडे आणि टी-20मध्ये विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे.

भारताचा ओपनर शिखर धवनही दोन क्रमवारी वर म्हणजेच २८व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर चेतेश्वर पुजारा चौथ्या क्रमांकावर कायम आहे. लोकेश राहुल आठव्या क्रमांकावर आणि अजिंक्य रहाणेच्या क्रमवारीमध्ये चार अंकांची घसरण झाली असून तो १४ व्या क्रमांकावर गेला आहे.

बॉलर्सच्या यादीवर नजर टाकली तर भुवनेश्वर कुमारनं आठ अंकांची उडी मारली आहे. भुवनेश्वर आता २९ व्या क्रमांकावर आहे. मोहम्मद शमीच्या क्रमवारीमध्येही एका अंकांचा सुधार होऊन तो १८ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजआधी टेस्ट क्रिकेटच्या बॉलर आणि ऑल राऊंडरच्या यादीत पहिल्या क्रमांकावर जायची संधी रवींद्र जडेजाला होती. पण कोलकात्याची खेळपट्टी फास्ट बॉलर्सला अनुकूल असल्यामुळे जडेजाला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर असेलला जडेजा तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. ऑफ स्पिनर आर. अश्विन चौथ्या क्रमांकावर कायम आहे.

देशांच्या क्रमवारीमध्ये १२५ अंकांसह भारत पहिल्या क्रमांकावर आणि १११ अंकांसह दक्षिण आफ्रिका दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे.