दुबई : आयपीएल (IPL) मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहली पाच महिन्यानंतर नेटवर सराव करण्यासाठी उतरला. त्यावेळी त्याने त्याचा अनुभव सांगितला. तो थोडा घाबरला होता असेही त्याने म्हटले आहे. युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या आयपीएलच्या 13 व्या सीजनआधी कोहली पहिल्यांदाच आपल्या सोबतच्या खेळाडूंसोबत सरावासाठी मैदानावर उतरला. कोहलीने या दरम्यानचा एक फोटो देखील शेअर केला आहे.
कोहली म्हणाला की, 'खरं सांगायचं तर मी विचार केला त्यापेक्षा हे खूप छान होतं. मी थोडा घाबरलो होतो, कारण मी गेल्या पाच महिन्यांपासून बॅट हातात घेतली नव्हती. परंतु मी जो विचार केला त्यापेक्षा हा खूपच चांगला अनुभव होता.' कोरोना विषाणूमुळे देशात लॉकडाऊनमुळे कोहलीने पाच महिन्यांनंतर प्रथमच सराव सुरू केला आहे. त्याच्यासोबत दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा माइक हेसन देखील होते.
कोहली म्हणाला की, 'मी लॉकडाऊन दरम्यान ट्रेनिंग घेतली होती. ज्यामुळे मला मदत झाली. मला खूप फिट असल्या सारखं वाटतंय. जर आपले शरीर हलके असेल तर आपण चांगल्याप्रकारे प्रतिक्रिया देऊ शकता आणि मला असे वाटते की बॉलला योग्य दिशा देण्यासाठी माझ्याकडे बराच वेळ आहे.'
कोहली म्हणाला की, 'अवजड शरीराने सराव सत्रात आलात तर जास्त हालचाल करता येत नाही आणि ती मग त्याचा मनावर परिणाम होतो. पण मी म्हटल्याप्रमाणे, मला ज्या पद्धतीने अपेक्षित होते त्यापेक्षा हे बरेच चांगले होते. कोहली व्यतिरिक्त युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर आणि शाहबाज नदीम आणि काही वेगवान गोलंदाजांनीही संघाच्या सराव सत्रात भाग घेतला. पहिल्या सत्रात त्यांनी ज्या पद्धतीने सराव केला त्याबद्दल कर्णधार कोहली आनंदी दिसला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे खेळाडू 21 ऑगस्टला दुबईला पोहोचले. कोरोनामुळे त्यांच्या 3 कोरोना टेस्ट होणार आहेत. सर्व खेळाडू व सोबतच्या स्टाफला ६ दिवस क्वारंटाईन राहावे लागत आहे. आयपीएल 2020 ची सुरुवात 19 सप्टेंबरपासून होणार आहे.