Olympic मेडल जिंकलं म्हणून शिक्षा करणारा देश! आता पदक विजेत्यांना महिनाभर...

Olympic Medalists Issue: सामान्यपणे कोणताही देश ऑलिम्पिक पदक जिंकून येणाऱ्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव करतो. मात्र जगातील एका देशामध्ये चक्क पदक जिंकणाऱ्या खेळाडूंवर टीकेचा वर्षाव होता असून या खेळाडूंसंदर्भात सरकारनेही कठोर निर्णय घेतला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 26, 2024, 09:06 AM IST
Olympic मेडल जिंकलं म्हणून शिक्षा करणारा देश! आता पदक विजेत्यांना महिनाभर... title=
जगभरात या शिक्षेची होतेय चर्चा

Olympic Medalists Issue: खेळांचा महाकुंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदक जिंकणं हे फार कठीण काम मानलं जातं. खेळ कोणताही असो आपल्याकडे एक तरी ऑलिम्पिकचं पदक असावं असं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. या स्पर्धेमधील आव्हान आणि स्पर्धा एवढी असते की अनेक देश कोणतंही पदक जिंकणाऱ्या आपल्या खेळाडूंना अगदी डोक्यावर उचलून घेतात. पदक जिंकल्यानंतर घर, गाडी, पैसा, सोनं, नोकरीबरोबरच अगदी सवलतींचा पाऊसही अशा पदकविजेत्या खेळाडूंवर पडतो. मात्र जगातील एका देशाने पदक जिंकणाऱ्या दोन खेळाडूंविरुद्ध समिती बसवून त्यांची चौकशी सुरु केली आहे. सध्या या चौकशीची जगभरात चर्चा सुरु आहे. 

त्या फोटोमुळे अडकले

उत्तर कोरियामधील टेबलटेनिसपटूं किम कूम-योंग आणि री जोंग-सिक यांच्याविरुद्ध तेथील सरकारने चौकशी सुरु केली आहे. आता या दोन्ही खेळाडूंनी भ्रष्टाचार केला, सामन्यामध्ये गोंधळ घातला, नियमांचं उल्लंघन केलं की काय असं तुम्हाला वाटू शकतं. मात्र देशासाठी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतरही या दोन्ही टेबलटेनिसपटूंविरुद्ध चौकशी करण्याचं कारण फारच विचित्र आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदक जिंकल्यानंतर या दोघांनी दक्षिण कोरियामधील खेळाडूंबरोबर हसत हसत सेल्फीसाठी पोज दिल्याने मोठा वाद निर्माण झाला असून या वादातूनच ही चौकशी सुरु करण्यात आली आहे.

हसत दिली पोज

'टेलिग्राफ'ने दिलेल्या वृत्तानुसार किम कूम-योग पदक जिंकल्यानंतर दक्षिण कोरियाच्या खेळाड़ूंबरोबरच्या फोटोत हसताना दिसला. री जोंग-सिक फोटोत हसताना दिसत नसला तरी त्याच्याविरुद्धही शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. किम कूम-योंग आणि री जोंग-सिक यांनी देशासाठी रौप्य पदक जिंकलं आहे. या दोघांनी चीनच्या सुवर्णपदक विजेत्यांबरोबरच कांस्यपदक जिंकणाऱ्या दक्षिण कोरियन खेळाडूंबरोबर पोडियमवर पोज दिली होती. यावरुनच आता सरकारने आक्षेप घेतला आहे. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया हे एकमेकांचे शत्रू आहेत. कट्टर शत्रू असलेल्या देशाच्या खेळाडूंबरोबर हसत पोज दिल्याने पदक जिंकून ही या देशातील खेळाडू वादात अडकले आहेत. 

स्पोट्समनशीपची चर्चा पण...

भेदभाव विसरुन उत्तर आणि दक्षिण कोरियाच्या खेळाडूंनी एकत्र फोटो काढण्याने हा फोटो स्पोट्समनशीपची दाखवणारा असल्याची चर्चा रंगली. तो प्रचंड व्हायरलही झाला. मात्र किम-जोंग-ऊनच्या नेतृत्वाखालील उत्तर कोरिया सरकारला हे पटलेलं नाही. हे असं हसणं 'देशभक्तीच्याविरोधात' होतं असं सरकारंचं म्हणणं आहे. त्यांनी याविरुद्ध चौकशीचे आदेश दिले आहेत. 

मायदेशी परत आल्यापासून महिनाभर...

किम कूम-योंग आणि री जोंग-सिक हे रौप्य पदक जिंकून 15 ऑगस्ट रोजी मायदेशी परतल्यापासून त्यांच्यावर टीका होता आहे. त्यांना महिन्याभराच्या स्वयम् स्वच्छता धोरणाअंतर्गत त्यांच्यावरील 'समाजवादी विचारधारेच्या विरुद्ध विचारांचा पगडा' असेल तर तो दूर करण्यास सांगितलं आहे, असं 'डेली एनके'ने म्हटलं आहे. यावर देशातील क्रिडा मंत्रालयाचं लक्ष असणार आहे. देशाच्या विचारसरणीबरोबर खेळाडू कायम राहतील याची काळजी घेतली जात आहे. ही एक प्रकारची मानसिक शिक्षाच मानली जाते. त्यामुळे पदक विजेत्यांना शिक्षा देणारा हा देश चर्चेत आहे.

न बोलण्याचा सल्ला आणि शिक्षेची धमकी

ऑलिम्पिकदरम्यान दक्षिण कोरियाच्या खेळाडूंबरोबर बोलू नये असं उत्तर कोरियाच्या खेळाडूंना सांगण्यात आलं होतं. उल्लंघन केल्यास मोठी शिक्षा केली जाईल असं सांगण्यात आलं होतं. आता पदक जिंकलं आणि त्यानंतर हसले म्हणून खेळाडूंना शिक्षा दिली जात असल्याबद्दल किम-जोंग-ऊनच्या सरकावर जगभरातून टीका होताना दिसत आहे.