'सर्वात वाईट कर्णधार' म्हणणाऱ्या गौतम गंभीरला पीटरसनने दिलं उत्तर, म्हणाला 'तो काही...'

IPL 2024: गौतम गंभीरने (Gautam Gambhir) माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनला (Kevin Pietersen) सर्वात वाईट कर्णधार म्हटलं आहे. यानंतर केविन पीटरसनने त्यावर उत्तर दिलं आहे.   

Updated: May 15, 2024, 04:09 PM IST
'सर्वात वाईट कर्णधार' म्हणणाऱ्या गौतम गंभीरला पीटरसनने दिलं उत्तर, म्हणाला 'तो काही...' title=

IPL 2024: इंग्लंडचा माजी क्रिकेटर केविन पीटरसनची (Kevin Pietersen) देशाच्या दिग्गज खेळाडूंमध्ये गणना केली जात आहे. पण केविन पीटरसनला फलंदाज म्हणून जितका महान दर्जा दिला जातो, तितका कर्णधार म्हणून मिळत नाही. नुकतंच भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने (Gautam Gambhir) केविन पीटरसनला सर्वात वाईट कर्णधार म्हटलं आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डेव्हिलिअर्सवरही (AB de Villiers) अशीच टीका केली आहे. गौतम गंभीरच्या विधानामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली असताना केविन पीटरसनही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे केविन पीटरसनने हे विधान गांभीर्याने घेण्याऐवजी मस्करीतच घेतलं आहे. 

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर केविन पीटरसन आणि एबी डेव्हिलियर्सने टीका केली होती. हार्दिकचं नेतृत्व अस्सल नसून थोडंसं अहंकारी होतं अशी टीका डेव्हिलियर्सने केली होती. त्यावर गौतम गंभीरने संताप व्यक्त करताना दोन्ही माजी क्रिकेटपटूंना सुनावलं होतं. 

“जेव्हा ते स्वतः कर्णधार होते तेव्हा त्यांची कामगिरी कशी होती? मला वाटत नाही की केविन पीटरसन किंवा एबी डेव्हिलिअर्सने कर्णधारपदी असताना त्यांच्या कारकिर्दीत नेतृत्वाच्या दृष्टिकोनातून फारशी चांगली कामगिरी केली. जर तुम्ही त्यांचे रेकॉर्ड बघितले तर ते इतर कोणत्याही नेतृत्वापेक्षा वाईट आहेत असं मला वाटतं,” असं गंभीरने Sportskeeda वर म्हटलं.

केविन पीटरसनने एक्सवर व्हिडीओवर कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्याने गौतम गंभीर चुकीचं बोलत नसून, मी फार भयंकर कर्णधार होतो अशी कबुली दिली आहे. त्याने हसतानाचे इमोजीही शेअर केले आहेत. 

दरम्यान गौतम गंभीरने डेव्हिलियर्सवरही टीका केली होती. “मला वाटत नाही की एबी डेव्हिलियर्सने आयपीएलमधील कोणत्याही सामन्याचं नेतृत्व केलं किंवा त्याने स्वतःच्या धावसंख्येशिवाय काहीही साध्य केलं आहे. संघाच्या दृष्टिकोनातून त्याने काही साध्य केलं आहे असे मला वाटत नाही. हार्दिक पांड्या अजूनही आयपीएल विजेता कर्णधार आहे. त्यामुळे तुम्ही फक्त संत्र्याची तुलना संत्र्याशी करावी, सफरचंदाची संत्र्याशी करु नये,” असंही तो म्हणाला.

गौतम गंभीर आयपीएलमधील यशस्वी कर्णधारांपैकी आहे. कोलकाता संघाचं नेतृत्व करताना त्याने दोनवेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. आयपीएल 2024 मध्ये तो मेंटॉर म्हणून परतला आहे. या हंगामात कोलकाता संघ प्लेऑफमध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरला आहे.