केव्हिन पीटरसनचा क्रिकेटला अलविदा, आता करणार हे काम

इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसननं क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे.

Updated: Mar 18, 2018, 04:57 PM IST
केव्हिन पीटरसनचा क्रिकेटला अलविदा, आता करणार हे काम title=

लंडन : इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसननं क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे. ३७ वर्षांचा पीटरसन जानेवारी २०१४पासूनच आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब होता. पीटरसननं इंग्लंडकडून १०४ टेस्ट खेळल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धची अॅशेस ही पीटरसनची शेवटची टेस्ट होती. या सीरिजमध्ये इंग्लंड ५-०नं हरलं होतं.

दक्षिण आफ्रिकेमध्ये जन्म झालेला पीटरसन इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. पीटरसननं १०४ टेस्टमध्ये ४७.२८ च्या सरासरीनं ८१८१ रन बनवले. यामध्ये २३ शतकं आणि ३५ अर्धशतकांचा समावेश होता. वनडेमध्ये पीटरसननं १३६ इनिंगमध्ये ४४४० रन्स बनवल्या. यामध्ये ९ शतकं आणि २५ अर्धशतकांचा समावेश आहे. पीटरसन ३७ आंतरराष्ट्रीय टी-20 खेळला आहे. २००५ मध्ये पीटरसनच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात झाली. पीटरसन ३ टेस्ट आणि १२ वनडेमध्ये इंग्लंडचा कॅप्टन होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला असला तरी केव्हिन पीटरसन टी-20 लीग क्रिकेटमध्ये खेळणार आहे.

२०१३-१४च्या अॅशेसमध्ये इंग्लंडचा ५-०नं पराभव झाल्यावर पीटरसनला इंग्लंडच्या टीममधून डच्चू मिळाला. यानंतर पीटरसन वेगवेगळ्या टी-20 लीगमध्ये दिसला. यामध्ये आयपीएलचाही समावेश आहे. २०१४ साली ११ आणि २०१६ साली ४ आयपीएल मॅचमध्ये पीटरसन खेळला. आयपीएलमध्ये पीटरसन आरसीबी, दिल्ली आणि पुण्याच्या टीमकडून खेळला. ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्येही पीटरसन सहभागी झाला होता.

पीटरसनची इन्स्टाग्रामवर पोस्ट

३० हजारांपेक्षा जास्त रन्स, १५२ अर्धशतकं, ६८ शतकं, ४ अॅशेस सीरिज विजय, टी-20 वर्ल्ड कपमध्ये विजय, भारताला भारतामध्ये हरवलं, बांग्लादेशसोडून सगळ्या टेस्ट खेळणाऱ्या देशांमध्ये शतकं... मला पाठिंबा देणाऱ्या माझ्या कुटुंबाला आणि मित्रांना धन्यवाद. मला याचा अभिमान आहे. या खेळावर माझं प्रेम आहे, अशी इन्स्टाग्राम पोस्ट केव्हिन पीटरसननं केली आहे.

आता काय करणार पीटरसन

क्रिकेटमधून संन्यास घेतल्यावर मी काय करणार असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. आता मी गेड्यांना संरक्षण देण्याची आणि त्यांना वाचवण्याची मोहीम हातात घेणार आहे. असं पीटरसन म्हणाला आहे.