मुंबई : आयपीएलमध्ये (IPL) हॅट्रिक घेणारा फिरकीपटू प्रवीण तांबेच्या (Pravin Tambe) जीवनावर आधारित 'कौण प्रवीण तांबे' (kaun pravin tambe) हा सिनेमा 1 एप्रिलला रिलीज होणार आहे. या सिनेमात अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) हा प्रवीण तांबेच्या भूमिकेत असणार आहे. जयप्रद देसाई (Jaiprad Desai) यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. या सिनेमाचं सध्या जोरदार प्रमोशन सुरु आहे. यादरम्यान प्रवीणने ‘स्पोर्ट्स विद रवीश’ या यूट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यामध्ये प्रवीणने अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली. (kaun pravin tambe biopic spinner pravin tambe give credit his sucess to team india former captain rahul dravid)
प्रवीणने आतापर्यंतच्या साऱ्या यशाचं श्रेय हे टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांना दिलं. तसेच रणजी क्रिकेट न खेळता आयपीएलमध्ये निवड कशी झाली, सोबत त्याच्या यशाचं संपूर्ण श्रेय कोणाचं आहे, हे देखील प्रवीणने सांगितलं.
"आज जे काही ते राहुल सरांमुळे"
"मी आज जे काही ते राहुल द्रविड यांच्यामुळे आहे. राहुल सरांनी ट्रायल्स दरम्यान माझं वय विचारलं असतं, तर आज कदाचित परिस्थिती काही वेगळी असती. त्यांनी फक्त माझी कामगिरी पाहिली. द्रविड सर माझ्या आयुष्यातील महत्त्वाची व्यक्ती आहे. आज प्रवीण तांबे जे काही आहे, ते राहुल सरांमुळेच आहे", असं प्रवीण तांबे म्हणाला.
"त्यांच्या सोबत बोलणं हे माझं स्वप्न होतं. राहुल सरांच्या नेतृत्वात मी खेळलोय. त्यांच्यासोबत खेळणं हे माझं स्वप्न होतं. काळजी करु नकोस, जा आणि बिंधास्त खेळ चांगलंच होईल", त्यांच्या या शब्दांनीच मला प्रेरणा दिली.
रणजी न खेळता आयपीएलमध्ये सिलेक्शन कसं झालं?
"मी रणजी स्पर्धेत कधी खेळलो नाही. मात्र मुंबईसाठी फार खेळलोय. या निमित्ताने अनेक दिग्ग्जांसोबत माझी ओळख झाली. अनेक जण मला ओळखायचे. मुंबईची टीम कशी आहे, हे सर्वांना माहिती आहे. त्या टीममध्ये निलेश कुलकर्णी, साईराज बहुतुले, रमेश पोवार आणि राजेश पोवार यासारखे दिग्गज होते. या सर्वांमुळे टीम मजबूत होती. यामुळे मुंबईकडून खेळणं हे टीम इंडियासाठी खेळण्याच्या तोडीचं होतं. या सर्वांमुळे मला संधी मिळत नव्हती. पण मी आपल्याला संधी मिळत नाही, असा नकारात्मक विचार केला नाही", असं प्रवीणने नमूद केलं.
"मी सातत्याने कल्ब क्रिकेटमध्ये खेळत होतो. त्यामुळे मुंबईमध्ये मला सर्व ओळखायचे की हा क्रिकेट खेळतो. मी चांगली कामगिरी करतोय, माझी फिटनेस चांगली आहे, तर मला संधी मिळेल, असा विश्वास मला होता. मी त्यानुसारच खेळत होतो",असं प्रवीणने सांगितलं.
प्रवीण तांबेची क्रिकेट कारकिर्द
प्रवीणने 2013 मध्ये आयपीएल पदार्पण केलं. यामध्ये प्रवीणने आतापर्यंत एकूण 33 सामन्यांमध्ये 28 विकेट्स घेतल्या. तसेच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 2013 आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये 2017 साली डेब्यू केलं. प्रवीणने फर्स्ट क्लासमधील 2 सामन्यात 2 तर लिस्ट ए मधील 6 मॅचेसमध्ये 5 विकेट्स घेतल्या आहेत.