दुबई : मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने संघात तीन बदल केले आहेत. आजच्या सामन्यात यशस्वी जयस्वाल आणि अंकित राजपूत यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश आहे. त्याचबरोबर युवा वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी यांना आजच्या सामन्यात डेब्यू केलं आहे. आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी त्याला देण्यात आली आहे.
या वर्षाच्या सुरुवातीच्या अंडर 19 वर्ल्डकप दरम्यान कार्तिक त्यागीने चमकदार कामगिरी केली होती. विश्वचषक स्पर्धेदरम्यान सुपर लीगच्या क्वार्टर फायनलच्या पहिल्याच ओव्हरमध्ये त्यागीने दोन ऑस्ट्रेलियन फलंदाजांना पॅव्हेलियनचा मार्ग दाखविला. कार्तिकच्या या शानदार गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाचा संघ अडचणीत आला. यानंतर विश्वचषकात भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली.
राजस्थान रॉयल्स संघाने गेल्या वर्षाच्या अखेरीस 1.30 कोटी रुपयांना आयपीएलच्या लिलावादरम्यान त्याला आपल्या संघात घेतले होते. कार्तिकला आपल्या संघात घेण्यासाठी राजस्थान आणि पंजाब यांच्यात स्पर्धा होती. शेवटी राजस्थानने त्याला संघात घेतलं.
अंडर 19 विश्वचषकात कार्तिक त्यागीने सहा सामन्यांत 11 बळी घेतले. मूळचा उत्तर प्रदेशच्या हापुराचा राहणारा कार्तिक त्यागी हा मध्यम गतीचा वेगवान गोलंदाज आहे. बॉल स्विंग करण्यासाठी तो ओळखला जातो. कार्तिकमध्ये एक विलक्षण यॉर्कर टाकण्याची क्षमता देखील आहे.