बोनस किंग अनुप कुमारचा कबड्डीतून 'काढता पाय'

सर्वाधिक गुण घेणाऱ्यांच्या टॉप-१० च्या यादीत तो ६ व्या स्थानी आहे.

Updated: Dec 20, 2018, 02:05 PM IST
बोनस किंग अनुप कुमारचा कबड्डीतून 'काढता पाय' title=

हरयाणा : बोनसचा बादशहा अशी ओळख असलेल्या अनुप कुमारने कबड्डीतून निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अनुपच्या निवृत्तीबद्दल वावड्या उठत होत्या. अनुप कुमार खऱ्या अर्थाने लोकप्रिय झाला तो, प्रो कबड्डी लीगमुळे. प्रो-कबड्डीमुळे अनुप घराघरांत पोहोचला. त्याने आपला चाहतावर्ग निर्माण केला होता.

कारकीर्द

अनुप कुमारची कारकीर्द फार यशस्वी होती. त्याने आपल्या १५ वर्षांच्या कारकीर्दीत अनेक संघांचे नेतृत्व केले. अनुप प्रो-कबड्डीच्या पहिल्या ५ हंगामात यु-मुम्बा संघासाठी खेळत होता. तर यंदाच्या ६ व्या हंगामात अनुप जयपूर पिंक पँथर संघासाठी खेळत होता. यंदाच्या प्रो-कबड्डीच्या हंगामात अनुप कुमारला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. त्यामुळे काल पंचकुलात झालेल्या सामन्यावेळी त्याने निवृत्ती जाहीर केली. 

अनुप कुमारने यंदाच्या हंगामातील १३ सामन्यांमध्ये ५० गुणांची कमाई केली. अनुपने आपल्या कारकिर्दीत एकूण ९१ सामने खेळले असून, त्याने ५९६ गुणांची कमाई केली आहे. सर्वाधिक गुण घेणाऱ्यांच्या टॉप-१० च्या यादीत तो ६ व्या स्थानी आहे. आशियाई स्पर्धेत तसेच विश्वचषक जिंकवून देण्यात अनुप कुमारचे महत्त्वपूर्ण योगदान होते. अनुप कुमारने भारताच्या राष्ट्रीय संघाची धुरा देखील आपल्या खांद्यावर घेतली होती. यात सुद्धा तो यशस्वी ठरला होता.