फुटबॉलने बदलून टाकले बाल गुन्हेगारांचे आयुष्य; आता जीवनाचा Goal फक्त एकच...

विधीसंघर्ष बालकांच्या या टीम मधील खेळाडूंनी कधी काळी गंभीर गुन्हे केले आहेत. मात्र, ते आता नागपुरात फुटबॉलचे धडे घेत जीवनात चांगल्या मार्गाने नाव कमावण्याचा गोल करण्याच्या उद्देशाने मेहनत घेत आहेत. 

Updated: Nov 21, 2022, 05:30 PM IST
फुटबॉलने बदलून टाकले बाल गुन्हेगारांचे आयुष्य; आता जीवनाचा Goal फक्त एकच... title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : कतारमध्ये सुरू असलेल्या FIFA वर्ल्डकपमध्ये(FIFA World Cup) 32 देश विजेतेपद पटकावण्यासाठी संघर्ष करत आहेत. तर, दुसरीकडे नागपूरमध्ये(Nagpur) पुण्यातील(Pune) एक संघही फुटबॉलची( football team ) जोरदार तयारी करत आहे. मात्र, हा संघ कोणता कप वा विजेतेपद पटकविण्याकरता मैदानावर घाम गाळत नाही तर त्यांचा संघर्ष सुरु आहे तो  समाजात कुटुंबियांचा आणि कायद्याचा गमावलेला विश्वास परत मिळवण्यासाठी. विधीसंघर्ष बालकांच्या या टीम मधील खेळाडूंनी कधी काळी गंभीर गुन्हे केले आहेत. मात्र, ते आता नागपुरात फुटबॉलचे धडे घेत जीवनात चांगल्या मार्गाने नाव कमावण्याचा गोल करण्याच्या उद्देशाने मेहनत घेत आहेत. नागपुरच्या बोखारा गावात अंधारात फ्लड लाईटमध्ये स्लम सॉकरचे जनक विजय बारसे(Vijay Barse is the father of slum soccer) यांच्या मार्गदर्शनात ते हे प्रशिक्षण घेत आहेत.

कोवळ्या वयात नकळत वा परिस्थितीमुळे गुन्हे केलेले हे सर्व विधी संघर्ष बालक आहेत. त्यामुळे कायद्याच्या तरतुदीनुसार अल्पवयीन असल्याने त्यांना (पुण्यात) बालसुधारगृह किंवा निरीक्षणगृहात ठेवण्यात आले.  तिथे ही त्यांची आक्रमकता कमी होत नव्हती. वेगवेगळे समूह बनवून त्यांच्यात टोळी युद्ध व्हायचे. त्यामुळे त्यांची आक्रमकता कमी करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी प्रशिक्षक संदेश बोर्डे यांच्या माध्यमातून पुण्यातील निरीक्षण गृहात त्यांना फुटबॉलचे धडे देण्यास सुरुवात करण्यात आली. 
त्यानंतर या मुलांच्या जीवनात सकारत्मक बदल आणि ऊर्जा दिसू लागली. निरीक्षण गृहात होणारी भांडणे थांबली. मुलांमध्ये फुटबॉल बद्दलची ओढ वाढू लागली. त्यांच्यातील हा सकारात्मक बदल पाहून त्यांना फुटबॉलचे पुढचे प्रशिक्षण देण्यासाठी न्यायालयाच्या विशेष परवानगीने नागपुरात विजय बारसे यांच्या प्रशिक्षण अकादमीत आणण्यात आले.

हळूहळू फुटबॉल मध्ये रस वाढल्यामुळे या विधीसंघर्ष बालकांची मनस्थिती ही बदलायला लागली आहे. त्यांच्या मनात टोळी निर्माण करण्याऐवजी टीम निर्माण करण्याचे विचार यायला लागले आहेत. या 9 मुलांमध्ये फुटबॉलच्या माध्यमातून समाजात, कुटुंबात आपला पुनर्वसन होऊ शकते. 

भविष्यात आपण आपल्या मेहनतीने पैसे कमावू शकतो, नाव कमावू शकतो, लौकिक मिळवू शकतो याबाबत विश्वास निर्माण होत आहे. आपल्या हातून झालेली चूक त्यांना उमगली आहे. फुटबॉलमुळे त्यांच्या जीवनाला नवा सकारत्मक गोल मिळाला असल्याची भावना ते व्यक्त करत आहेत. समाज आणि आमचे कुटुंब आमच्याबद्दल नकारात्मक विचार करणार नाही असे वाटायला लागले आहे. स्लम सॉकरच्या मदतीने शेकडो मुलांच्या जीवनात बदल घडवून आणणारे विजय बारसे विधी संघर्ष बालकांच्या पुनर्वसनासाठी फुटबॉलच्या प्रयोगाने कमालीचे उत्साहित आहेत. भविष्यात सर्वच निरीक्षणगृहात (बालसुधार गृहात) असे प्रयोग झाले, तर विधी संघर्ष बालकांना गुन्हेगारी पासून परावृत्त करण्यासाठी फुटबॉल आणि इतर क्रीडा प्रकारांपेक्षा जास्त उपयोगी दुसरा मार्ग नसल्याचे विजय बारसे यांचे म्हणणे आहे.