IPLच्या इतिहासतले युवा कर्णधार, ऋषभ पंतला हिटमॅन रोहितचा रेकॉर्ड मोडण्याची सुवर्णसंधी

हिटमॅन रोहित शर्माचा कोणता रेकॉर्ड तोडण्याची संधी ऋषभ पंतला आहे जाणून घ्या.

Updated: Mar 31, 2021, 12:55 PM IST
IPLच्या इतिहासतले युवा कर्णधार, ऋषभ पंतला हिटमॅन रोहितचा रेकॉर्ड मोडण्याची सुवर्णसंधी title=

मुंबई: दिल्ली कॅपिटल्स संघाच्या नेतृत्वाची धुरा ऋषभ पंतकडे आली आहे. श्रेयस अय्यरला झालेल्या खांद्याच्या दुखापतीमुळे तो यावेळी IPL खेळू शकणार नाही. तर IPL सुरू होण्यापूर्वी 8 एप्रिलला श्रेयसच्या खांद्याची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाची कमान पंतच्या खांद्यावर आल्यानंतर रहाणे आणि स्टिव स्मितला मात्र सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे.

दुसरीकडे ऋषभ पंत हा सर्वात युवा कर्णधार असणार आहे. IPL 2021 चौदाव्या हंगामात त्याच्याकडे हिटमॅन रोहित शर्माचं रेकॉर्ड तोडण्याची संधी असणार आहे. दुसरं आणि महत्त्वाचं म्हणजे ऋषभ पंत IPLच्या इतिहासातील 5वा सर्वात युवा कर्णधार बनला आहे. या पूर्वीचे युवा कर्णधार कोण आणि हिटमॅनचा कोणता रेकॉर्ड तोडण्याची संधी मिळणार जाणून घ्या.
IPLच्या इतिहासातील युवा कर्णधार कोण?
IPLच्या इतिहासात सर्वात युवा कर्णधारांमध्ये विराट कोहलीचंही नाव आहे. वयाच्या 22 व्या वर्षी त्याच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी आली. स्टीव स्मिथ दुसरा युवा कर्णधार म्हणून ओळखला जातो. वयाच्या 22 वर्ष 11 महिन्यांचा असताना संघाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. 

तिसऱ्या क्रमांकावर सुरेश रैना आहे. 23 वर्षांचा असताना त्याच्या खांद्यावर संघाची कमान सांभाळण्याची जबाबदारी आली होती. तर चौथ्या स्थानावर श्रेयस अय्यर आहे. 23 व्या वर्षी श्रेयस अय्यरच्या खांद्यावर संघाच्या कर्णधारपदाची धुरा देण्यात आली होती. श्रेयस अय्यरला झालेल्या दुखापतीमुळे आता पाचव्या स्थानावर ऋषभ पंतचं नाव आलं आहे. कमी वयात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली आहे. 

स्वप्न पूर्ण झाल्याची भावना ऋषभ पंतनं व्यक्त केली आहे. ऋषभची कसोटी आणि वन डेमधील कामगिरी देखील चांगली राहिली आहे. त्याचा फायदा IPLदरम्यान दिल्ली कॅपिटल्स संघाला होणार आहे. रोहित शर्मानं कमी वयात कर्णधारपदी असताना IPLची ट्रॉफी मिळवली आहे. तर ऋषभ पंतकडे हा रेकॉर्ड तोडण्याची हीच सुवर्णसंधी आहे. त्यामुळे हा रेकॉर्ड तोडण्यासाठी पंत काय नियोजन करणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.