IPL Owners Meeting Argument SRH Owner Kavya Maran On Abhishek Sharma: इंडियन प्रिमिअर लीगच्या 18 व्या पर्वासाठीच्या हलचाली सुरु झाल्या आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या स्पर्धेसाठीच्या नियमांबद्दल चर्चा करण्यासंदर्भात नुकतीच संघ मालकांची एक बैठक आयोजित केलेली. या बैठकीमध्ये चर्चेदरम्यान मतभेदांवरुन संघ मालकांमध्ये चांगलाच वाद झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र या वादामध्ये आपली भूमिका मांडताना सनरायझर्स हैदराबादच्या मालकीण काव्या मारन यांनी थेट 2024 च्या स्पर्धेमध्ये धडाकेबाज कामगिरी करणारा सलामीवीर अभिषेक शर्माचा उल्लेख केला. नेमकं काव्या मारन काय म्हणाल्या जाणून घेऊयात...
आयपीएलच्या 18 व्या पर्वात म्हणजेच 2025 च्या पर्वासाठी लिलावामध्ये अधिक खेळाडू असावेत की मर्यादीत यासंदर्भात संघ मालकांच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. यावेळेस शाहरुख खानने रिटेन केल्या जाणाऱ्या खेळाडूंची संख्या अधिक ठेवण्याची भूभा दिली जावी असं कोलकाता नाईट रायडर्सचा मालक म्हणून सांगितलं. यामुळे बराऱ्याच काळापासून तयार केलेला संघ कायम राखण्यासाठी मदत होईल अशी शाहरुखची भूमिका होती. त्यामुळेच मर्यादित खेळाडू रिटेन करायला देण्यापेक्षा अधिक खेळाडू रिटेन करु दिले तर ते अधिक बरं पडेल असं शाहरुखचं म्हणणं होतं. त्याने यंदाच्या पर्वासाठी खेळाडूंचा लिलावच घेऊ नये अशी भूमिका मांडली.
मात्र त्याचवेळी दुसरीकडे पंजाब किंग्ज इलेव्हनचे सहमालक नेस वाडिया यांनी शाहरुखच्या भूमिकेला पूर्णपणे विरोध करत अगदी उलट भूमिका मांडली. कमीत कमी खेळाडूंना रिटेन करुन अधिक खेळाडू लिलावासाठी उपलब्ध झाले तर अधिक चांगला संघ बांधता येईल अशाप्रकारचा वाडिया यांचा युक्तिवाद होता. म्हणजेच या बैठकीमध्ये रिटेन्शन विरुद्ध लिलाव असा वाद झाला. शाहरुख रिटेन्शनसाठी युक्तीवाद करत होता तर नेस वाडियांचं म्हणणं लिलावात अधिक खेळाडू येतील असे नियम हवेत असं होतं. दोघांमध्ये यावरुन चांगलीच खडाजंगी झाल्याचं वृत्त 'क्रिकबझ'ने दिलं आहे.
दरम्यान, या वादामध्ये सनरायझर्स हैदराबादच्या मालकीण असलेल्या काव्या यांनी शाहरुखची बाजू घेतली. यावेळेस आपलं म्हणणं मांडताना काव्य यांनी सध्या भारतीय संघाकडून खेळणाऱ्या अभिषेक शर्माचा उल्लेख करत उदाहरण दिलं. "एक संघ तयार करण्यासाठी फार वेळ लागतो. ज्याप्रमाणे चर्चा झाली त्यानुसार मी हे ही सांगू इच्छिते की तरुण खेळाडूंना समज येण्यासाठी म्हणजेच ते प्रतिभावन खेळाडू होण्यासाठी बराच वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो. अभिषेक शर्माला सातत्यपूर्ण कामगिरी करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागला. आता तो सातत्यपूर्ण कामगिरी करतोय. तुम्ही हे सुद्धा मान्य कराल की अशी अनेक उदाहरणे इतर संघांमध्येही आहेत," असं काव्या मारन यांनी बैठकीमध्ये अगदी स्पष्टपणे आपली भूमिका मांडताना सांगितलं.
दिल्ली कॅपिटल्सचे किरण कुमार गांधी आणि पार्थ जिंदाल, लखनऊ सुपर जायंट्सचे संजीव गोयंका या बैठकीला उपस्थित होते. चेन्नई सुपर किंग्जचे रुपा गुरुनाथ, राजस्थान रॉयल्सचे मनोज बडाले, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे प्रथमेश मिश्राही या बैठकीसाठी उपस्थीत होते. मुंबई इंडियन्सच्या मालकांनी म्हणजे अंबानींनी ऑनलाइन माध्यमातून बैठकीला हजेरी लावली.