IPL Auctions: २० लाखांची किंमत पण ८.४० कोटी मिळवणारा वरुण चक्रवर्ती म्हणतो...

आयपीएलच्या १२व्या मोसमासाठीचा लिलाव जयपूरमध्ये पार पडला.

Updated: Dec 19, 2018, 05:27 PM IST
IPL Auctions: २० लाखांची किंमत पण ८.४० कोटी मिळवणारा वरुण चक्रवर्ती म्हणतो... title=

चेन्नई : आयपीएलच्या १२व्या मोसमासाठीचा लिलाव जयपूरमध्ये पार पडला. या लिलावामध्ये वरुण चक्रवर्ती हा सगळ्यात महागडा खेळाडू ठरला. २० लाख रुपये बेस प्राईज असलेल्या वरुणला ४० पट जास्त म्हणजेच ८ कोटी ४० लाख रुपये मिळाले. पंजाबच्या टीमनं वरुण चक्रवर्तीवर एवढे पैसे खर्च केले. तामीळनाडू प्रीमिअर लीग आणि विजय हजारे ट्रॉफीमधल्या कामगिरीमुळे वरुणनं आयपीएलच्या सगळ्या टीमचं लक्ष वेधून घेतलं.

एका दिवसामध्ये कोट्यधीश झालेल्या वरुण चक्रवर्तीचा अजूनही यावर विश्वास बसत नाहीये. एखादी टीम मला २० लाख रुपयांमध्ये विकत घेईल, असं मला वाटलं होतं. एवढ्या रकमेचा मी विचारही केला नव्हता. माझ्याकडे ही मोठी संधी आहे, असं चक्रवर्ती म्हणाला. अश्विन सारख्या खेळाडूकडू मी खूप काही शिकलो आहे, अशी प्रतिक्रियाही त्यानं दिली. आयपीएलमध्ये आता वरुण चक्रवर्ती अश्विनच्याच नेतृत्वातल्या पंजाबच्या टीमकडून खेळणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंकडून मी आयपीएलमध्ये बऱ्याच गोष्टी शिकेन, असा विश्वास वरुणनं व्यक्त केला आहे. दिग्गज खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूममध्ये राहण्याची मी आतुरतेनं वाट पाहत असल्याचं वरुण म्हणाला.

सुरुवातीला मध्यम जलदगती बॉलर असणारा वरुण चक्रवर्ती नंतर स्पिनर बनला. गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे जलदगती बॉलरपासून स्पिनर बनण्याचा निर्णय घेतल्याचं, वरुण म्हणाला. आता वरुण चक्रवर्तीकडे ७ वेगवेगळ्या प्रकारचे बॉल आहेत.

२७ वर्षांच्या वरुण चक्रवर्तीनं आत्तापर्यंत फक्त एक प्रथम श्रेणी मॅच आणि ९ लिस्ट ए मॅच खेळल्या आहेत. आयपीएलमध्ये वरुणनं आत्तापर्यंत एकही मॅच खेळलेली नाही. तामीळनाडू प्रीमिअर लीगमध्ये वरुणनं सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. या स्पर्धेत वरुणनं ९ मॅचमध्ये २२ विकेट घेतल्या होत्या.

वरुणनं विजय हजारे ट्रॉफीमध्ये ४.७ च्या इकोनॉमी रेटनं ९ विकेट घेतल्या आहेत. विजय हजारे ट्रॉफीमध्ये वरुण दुसरा यशस्वी बॉलर ठरला होता. वरुण याआधी टेनिस बॉलनं क्रिकेट खेळायचा. टेनीस बॉलच्या व्हेरियेशन्सचा प्रयोग त्यानं सिझन बॉल क्रिकेटमध्ये केला आणि यशस्वी झाला.

वरुण चक्रवर्तीनं त्याच्या क्रिकेटची सुरुवात शाळेपासूनच केली होती. पण अंडर-१७ आणि अंडर-१९ क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी न केल्यामुळे त्यानं क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर वरुणनं ५ वर्ष आर्किटेक्चरचा कोर्स केला आणि एक वर्ष नोकरी केली. नोकरी करत असतानाच वरुणनं पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ यावेळेत काम करण्यात वरुणला रस नसल्यामुळे त्यानं पुन्हा क्रिकेटवर लक्ष केंद्रीत केलं. २५व्या वर्षी वरुण चक्रवर्तीनं पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात पाऊल ठेवलं.