IPL Auction: शतक, मॅन ऑफ द मॅच, तरी बोली का नाही? मनोज तिवारीची खंत

आयपीएलचा लिलाव मंगळवारी जयपूरमध्ये पार पडला.

Updated: Dec 19, 2018, 04:48 PM IST
IPL Auction: शतक, मॅन ऑफ द मॅच, तरी बोली का नाही? मनोज तिवारीची खंत title=

जयपूर : आयपीएलचा लिलाव मंगळवारी जयपूरमध्ये पार पडला. या लिलावामध्ये अनेक नवोदित खेळाडू कोट्यधीश झाले. तर काही दिग्गजांना बोली न लागल्यामुळे मोठा धक्का बसला. भारताचा क्रिकेटपटू मनोज तिवारीलाही कोणत्याच टीमनं विकत न घेतल्यामुळे झटका लागला आहे. ट्विटरवर त्यानं आपली ही खंत बोलून दाखवली आहे.

माझं नेमकं काय चुकलं याचा मी विचार करतोय. भारतासाठी शतक केल्यानंतरही लागोपाठ १४ मॅच मला बाहेर का बसवण्यात आलं? आयपीएलच्या २०१७ सालच्या मोसमात मला एवढे मॅन ऑफ द मॅच मिळाले, तरी माझ्यावर बोली का लागली नाही? माझ्याकडून काय चूक झाली?, असं ट्विट मनोज तिवारीनं केलं आहे. या ट्विटमध्ये तिवारीनं त्यानं भारताकडून मारलेलं शतक आणि २०१७ सालच्या आयपीएलमध्ये मिळवलेल्या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी यांचे फोटो शेअर केले आहेत.

२०१७-१८ च्या मोसमात मनोज तिवारीनं १२६.७० च्या सरासरीनं ५०७ रन केल्या. भारताच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधलं हे रेकॉर्ड आहे. विजय हजारे ट्रॉफी आणि देवधर ट्रॉफीमध्येही मनोज तिवारीची सरासरी १०० पेक्षा जास्त होती. आजपर्यंत कोणत्याच बॅट्समनला एका मोसमात अशी कामगिरी करता आलेली नाही.

मनोज तिवारीनं भारताकडून १२ वनडे मॅच खेळल्या आहेत. तिवारीनं २६.०९ च्या सरासरीनं २८७ रन केले. यामध्ये एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. तिवरीनं २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध चेन्नईमध्ये १२६ बॉलमध्ये नाबाद १०४ रन केले. याचबरोबर तिवारीनं ३ टी-२० मॅचच्या एका इनिंगमध्ये १५.०० च्या सरासरीनं १५ रन केल्या आहेत.