रोहित शर्माची भविष्यवाणी खरी ठरणार, 'या' खेळाडूला टी20 वर्ल्ड कपसाठी संधी मिळणार

Dinesh Karthik IPL 2024: आयपीएल स्पर्धेनंतर लगेचच टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. यासाठी 1 मे पर्यंत बीसीसीआयला संघाची निवड करायची आहे. आयपीएलमधल्या कामगिरीवर खेळाडूंची निवड केली जाणार आहे. अशात एक नाव चांगलंच चर्चेत आहे.

राजीव कासले | Updated: Apr 16, 2024, 05:55 PM IST
रोहित शर्माची भविष्यवाणी खरी ठरणार, 'या' खेळाडूला टी20 वर्ल्ड कपसाठी संधी मिळणार title=

IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंमामाच्या 25 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) आणि मुंबई इंडियन्स ( दरम्यान 11 एप्रिलला सामना खेळवण्यात आला. या सामन्यात एक अशी घटना घडली ज्याची सामन्यानंतर जोरदार चर्चा झाली. बंगळुरुचा दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) फलंदाजी करत होता. स्टम्पच्या मागे मुंबई इंडियन्सचा विकेटकिपर ईशान किशन आणि स्लिपमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) उभे होते. यावेळी रोहित शर्माने दिनेश कार्तिकला उद्देशहून एक वक्तव्य केलं जे स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झालं. रोहित शर्माने दिनेश कार्तिकला 'शाबाश डिके, वर्ल्ड कप खेळायचंय अजून...' असं म्हटलं.

रोहित शर्माचं हे वक्तव्य ऐकून दिनेश कार्तिकच्या चेहऱ्यावरही हसू पसरलं. कार्तिकने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या या सामन्यात 23 चेंडूत तब्बल 53 धावा केल्या.  सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभव पत्करावा लागला पण दिनेश कार्तिकच्या फलंदाजीने चाहत्यांची मनं जिकंली. दिनेश कार्तिकने अवघ्या 35 चेंडूत 83 धावा केल्या. यात त्याने 7 षटकार आणि 5 चौकारांची बरसात केली. दिनेश कार्तिकच्या या कामगिरीने ऋषभ पंत, संजू सॅमसन, ईशान किशन, केएल राहुल आणि जितेश शर्मा या विकेटकिपरसाठी धोक्याची घंटी वाजली आहे. 

टी20 वर्ल्ड कपसाठी दावा
टी20 वर्ल्ड कपसाठी दिनेश कार्तिकने आपला मजबूत दावा ठोकला आहे.  यंदाच्या आयपीएलमध्ये आरसीबीला समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही पण 38 वर्षांच्या दिनेश कार्तिकने आपल्या कामगिरीने बीसीसीआय निवड समितीला आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे. ज्या प्रकारे दिनेश कार्तिक फलंदाजी आणि स्टम्पच्या मागे कामगिरी करतोय ते पाहाता या वयातही तो युवा खेळाडूंना आव्हान देतोय हे नक्की.

रोहित शर्माची भविष्यवाणी खरी ठरणार
रोहित शर्माने मस्करीतच दिनेशक कार्तिकबद्दल ते वक्तव्य केलं असेल. पण कार्तिकची फलंदाजी पाहात टी20 वर्ल्ड 2024 मध्ये खेळण्यासाठी तो इच्छूक आहे. कार्तिकने टी20 क्रिकेटमध्ये 6000 धावांचा टप्पाही पूर्ण केला आहे. 

टी20 चा बेस्ट फिनिशर
सनरायजर्स हैदराबाद विरुद्धची त्याची कामगिरी पाहिली तर आजही दिनेश कार्तिक टी20 क्रिकेटमधला बेस्ट फिनिशर असल्याचं दिग्गज क्रिकेटपटूही मान्य करतात. कार्तिकने 237.14 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. यादरम्यान त्याने 108 मीटर दूर षटकारही खेचला. वर्ल्ड क्लास गोलंदाज पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवरही त्याने तुफान फटकेबाजी केली. या सामन्यात स्टेडिअममध्ये काही फॅन्सच्या हातात कार्तिकला पाठिंबा देणारे बोर्डही होते. एका पोस्टरवर 'द रियल थाला' असं लिहिण्यात आलं होतं. दिनेश कार्तिकने यंदाच्या आयपीएलमध्ये  7 सामन्यात 226 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 205.45 इतका आहे. 

टीम इंडियासाठी कामगिरी
दिनेश कार्तिक टीम इंडियासाठी शेवटचा टी20 आंतरराष्ट्रीय सामना 2 नोव्हेंबर 2022 मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळला होता. तर शेवटचा कसोटी सामना इंग्लंडविरुद्ध 2018 मध्ये खेळला. दिनेश कार्तिक आयपीएल 2023 मध्ये फ्लॉप ठरला होता. त्याआधी 2022 च्या आयपीएलमध्ये दिनेश कार्तिकने 16 सामन्यात 330 धावा केल्या. या कामगिरीच्या जोरावर त्याची 2022 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियात निवड झाली होती.

दिनेश कार्तिकची क्रिकेट कारकिर्द
26  कसोटी,  1025 धावा, 25.00 अॅव्हरेज,  57 कॅच, 6 स्टम्प 
94 वन डे, 1752 धावा, 30.20 अॅव्हरेज, 64 कॅच, 7 स्टम्प 
60 टी20, 686 धावा, 26.38 अॅव्हरेज, 30 कॅच, 8 स्टम्प 
249 आयपीएल, 4742 धावा, 26.64 अॅव्हरेज, 142 कॅच 36 स्टम्प