Sunil Narine On muted celebration : कोलकाता नाईट रायडर्सचा हुकमी एक्का म्हणून सुनील नारायण (Sunil Narine) यंदाच्या हंगामात समोर आला आहे. मेन्टॉर गौतम गंभीरने हिऱ्याची पारख केली अन् प्रत्येक सामन्यात सलामीसाठी पाठवलं. याचा परिणाम असा झाला की, कोलकाताचा (KKR) हा हिरा प्रत्येक सामन्यात चमकला अन् संघाने थेट पाईंट्स टेबलच्या टॉपवर कब्जा केला. सुनील नारायण कोलकाताला एकहाती विजय मिळवून देतोय. मात्र, कितीही मोठी कामगिरी केली तरी सुनील नारायण सेलिब्रेशन करत नाही. शतक ठोकलं तरी सुनील नारायण शांत अन् विकेट्स घेतल्या तरी नारायण शांत... नारायणच्या स्पिनची मिस्ट्री उलघडली पण त्याच्या शांत स्वभावाची (muted celebration) नाही. त्यावरच आता स्वत: नारायणने खुलासा केला आहे.
काय म्हणाला सुनील नारायण?
तुम्ही मोठे होताय... मला माझ्या वडिलांकडून एक धडा मिळाला तो म्हणजे आज जर तुम्ही एखाद्याची विकेट काढली तर तुम्हाला उद्या आणि पुढच्या वेळी त्या खेळाडूचा सामना करायचा तर आहेच. त्याला पुन्हा खेळायचं आहे. त्यामुळे मला वाटतं की त्या क्षणाचा तुम्ही जितका आनंद घेऊ शकता तितका आनंद घ्या पण त्याचा अतिरेक करू नका, असं सुनील नारायण म्हणतो. खेळ कधीही गृहीत धरू नका आणि नेहमी क्षणाचा आनंद घ्या, असंही सुनील नारायण याने म्हटलं आहे. जर तुम्ही खेळाडूला बाद केलं अन् पुढच्या सामन्यात त्याने बदला घेतला तर..? असा सवाल विचारून सुनील नारायण याने मजेशीर उत्तर दिलं.
कोलकाता नाईट रायडर्सच्या पॉडकास्टमध्ये सुनील नारायणने उत्तर दिलं. माझ्या वडिलांनी मला अनुकूल परिस्थितीत संयम राखण्याची शिकवण दिली आणि त्याचा फायदा क्रिकेटमध्ये झाला. तुमच्या खेळण्याचा तुमच्या स्वभावावर देखील परिणाम होतो, असंही तो म्हणाला. त्यावेळी सुनीलने आयपीएलमधील अनुभव आणि स्टॅट्रजीवर खुलासा देखील केलाय.
दरम्यान, सुनील नारायण यासाठी यंदाचा आयपीएल हंगाम खूप चांगला राहिला आहे. त्याने यंदाच्या हंगामात 11 सामन्यात 461 धावा केल्या आहे. त्यातही त्याता स्ट्राईक रेट 183 चा आहे. समोर कोणताही संघ असो सुनील नारायण सुट्टी देत नाही. फलंदाजीमध्येच नाही तर नारायणने गोलंदाजीत देखील कमाल दाखवलीये. त्याने 11 सामन्यात 14 विकेट्स घेतल्या आहेत. ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅचच्या शर्यतीत अजूनही सुनील नारायण कायम आहे.