IPL 2024 Sunil Gavaskar Angry At Gautam Gambhir Theory: मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज व्यतिरिक्त सर्वाधिक वेळा इंडियन प्रिमिअर लिगच्या चषकावर नाव कोरणारा संघ अशी ओळख असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने यंदाच्या पर्वाची सुरुवात विजयासहीत केली. शनिवारी झालेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्धचा रोमहर्षक सामना केकेआरने अवघ्या 4 धावांनी जिंकला. मात्र या विजयाचे श्रेय काही वर्षानंतर पुन्हा कोलकात्याचं प्रशिक्षकपद स्वीकारणाऱ्या गौतम गंभीरला दिलं जात असल्याने ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावसकर चांगलेच संतापल्याचं दिसत आहे.
झालं असं की, हैदराबादविरुद्ध मिळवलेल्या या विजयामध्ये केकेआरच्या संघातील वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज आंद्रे रसेलने मोलाचे योगदान दिले. आंद्रे रसेलने अवघ्या 25 बॉलमध्ये 64 धावांची तुफानी खेळी करत केकेआरला आव्हानात्मक स्कोअर उभा करण्यास मदत केली. विशेष म्हणजे आंद्रे रसेलने गोलंदाजी करतानाही 2 विकेट्स मिळवून देत अष्टपैलू कामगिरी करत संघाचा विजय सुनिश्चित केला. त्याला सामनावीर हा पुरस्कारही मिळाला. मात्र सामना जिंकल्यानंतर आंद्रे रसेलच्या या खेळीऐवजी गौतम गंभीरला विजयाचं श्रेय दिलं जात असल्याचं पाहून गावसकर यांनी आक्षेप नोंदवत अशाप्रकाराची विधानं योग्य नसून हा केकेआरचा केवळ पहिला सामना असल्याची आठवण गंभीर समर्थकांना करुन दिली.
आंद्रे रसेलच्या खेळीचा परिणाम फार मोठा होता असं सांगताना गावसकर यांनी पुढील सामन्यांमध्ये जर आंद्रे रसेल अपयशी ठरला तर जसं आता श्रेय गंभीरला दिलं जात आहे त्याप्रमाणे दोषही गंभीरला दिला जाईल का असा प्रश्न उपस्थित केला. "आपण यावर फार चर्चा करायला नको. त्याने उत्तम फलंदाजी केली. कोणी केकेआरच्या संघाशी परत जोडला गेल्याशी या खेळीचा संबंध लावणं चुकीचं आहे. पुढील काही सामन्यांमध्ये तो (आंद्रे रसेल) चांगला खेळला नाही तर तुम्ही गौतम गंभीरला दोष देणार का? आपण याकडे जरा सामान्य दृष्टीकोनातून पाहिलं पाहिजे," असं गावसकर सामना संपल्यानंतर स्टार स्पोर्टवर मत मांडताना म्हणाले.
नक्की वाचा >> CSK मध्ये वाद? ऋतुराजला कर्णधार केल्याने जडेजा नाराज? कोच फ्लेमिंग म्हणतो, 'ऋतुराज नक्कीच त्याची..'
आंद्रे रसेलने उत्तम फलंदाजी केली हे सांगताना हैदराबादच्या गोलंदाजांना प्रभाव पाडता आला नाही असंही ते म्हणाले. "भुवनेश्वर कुमारसारखा खेळाडू सरावादरम्यान उत्तम गोलंदाजी करतो पण प्रत्यक्ष सामन्यात तो लेग साईडला गोलंदाजी करतो जिथून आंद्रे रसेल सहज फटकेबाजी करु शकतो. त्यातही आंद्रे रसेलसारखा एखादा फलंदाज स्फोटक फलंदाजी करत असेल तर त्याच्यासमोर कोणाचंही काही चालत नाही," असं गावसकर म्हणाले.