आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम, अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज

IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम जमा झाला आहे. अशी कामगिरी करणारा आयपीएलमधला तो पहिला फलंदाज ठरला आहे. 

राजीव कासले | Updated: Apr 2, 2024, 03:49 PM IST
आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम, अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज title=

IPL 2024 : आयपीएलच्या चौदाव्या सामन्यात राजस्था रॉयल्सने मुंबई इंडियन्सला त्यांच्याच घरात धुळ चारली. पहिली फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) डाव अवघ्या 125 धावांवर आटोपला. विजयाचं हे आव्हान राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) सोळाव्या षटकातच 4 विकेटच्या मोबदल्यात पूर्ण  केलं. राजस्थान रॉयल्सच्या रियान परागने (Riyan Parag) मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई करत नाबाद 54 धावा केल्या. यात त्याने 3 षटकार आणि 5 चौकारांची बरसात केली. ज्या मैदानावर मुंबईचे फलंदाज अपयशी ठरले. त्याच मैदानावर रियान परागने फटकेबाजी करत राजस्थानला 'रॉयल' विजय मिळवून दिला. राजस्थान रॉयल्सचा हा सलग तिसरा विजय ठरला असून पॉईंटटेबलमध्ये राजस्थानने अव्वल स्थान गाठलं आहे. तर मुंबई इंडियन्सचा हा तिसरा पराभव ठरला असून पॉईंटटेबलमध्ये मुंबई शेवटच्या म्हणजे दहाव्या स्थानावर आहे.

रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम
या सामन्यात मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर एक नकोसा विक्रम जमा झाला आहे. या सामन्यात मुंबईचे पहिले तीन फलंदाज भोपळा न फोडताच बाद झाले. यात रोहित शर्मा, नमन धीर आणि डेवाल्ड ब्रेविसचा समावेश होता. रोहित शर्मा आयपीएल इतिहासत सर्वाधिक शुन्यावर बाद होणारा फलंदाज ठरला आहे. आयपीएलमध्ये रोहित शर्मा तब्बल 17 वेळा शुन्यावर बाद झालाय. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा फलंदाज-विकेटकिपर दिनेश कार्तिकही सतरा वेळा शुन्यावर बाद झाला आहे. 

यानंतर बंगळुरुचा आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलचा नंबर लागतो. मॅक्सवेल आयपीएलमध्ये आतापर्यंत 15 वेळा शुन्यावर बाद झालाय. या यादीत चौथ्या क्रमांकावर मुंबईचा पीयुष चावला आहे. पियुष चावलाही आतापर्यंत 15 वेळा खातं न खोलता बाद झालाय. मंदीप सिंह आणि सुनील नरेनही 15 वेळा शुन्यावर बाद झालेत. 

रोहित शर्माची आयपीएल कारकिर्द
आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या सर्वाधिक वेळा शुन्यावर बाद होण्यााच विक्रम जमा असला, तरी आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही रोहितच्याच नावावर आहे. हिटमॅनने आयपीएलमध्ये आतापर्यंत 246 सामने खेळला असून यात त्याच्या नावावर तब्बल 6280 धावा जमा आहेत. यात एक शतक आणि तब्बल 42 अर्धशतकांचा समावेश आहे. 109 ही रोहितची आयपीएलमधली सर्वोत्तम धावसंख्या आहे. 

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालीच मुंबई इंडिन्सने तब्बल पाचवेळा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने कर्णधारपदावरुन रोहित शर्माची उचलबांगडी केली आणि हार्दिक पांड्याकडे संघाची धुरा सोपवली.