Virat Kohali vs Sachin Tendulkar: भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू नवज्योत सिंग सिद्धू यांनी विराट कोहली भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात महान फलंदाज असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी विराट कोहलीला सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर, सर रिचर्ड्स यांच्यापेक्षाही विराटला वरचं स्थान दिलं आहे. विराट कोहली भारताला लाभलेला आतापर्यंतचा सर्वात महान खेळाडू असल्याचं सिद्धू म्हणाले आहेत. 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
विराट कोहलीने आरसीबीकडून खेळताना तिसऱ्या क्रमांकावर यावं असा अनेकांचा युक्तिवाद आहे. याबद्दल विचारण्यात आलं असता सिद्धू यांनी जर संघाला गरज नसेल तर त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ नये असं स्पष्ट सांगितलं. "मला तसं वाटत नाही. हीच संघाची गरज आहे. तो जगातील महान खेळाडू नक्की आहे. पण जर तुमचा संघ एकदाही जिंकला नसेल, एकदाही ट्रॉफी उचलण्याची संधी मिळाली नसेल तर हा डाग पुसण्याचा नक्कीच तुमचा प्रयत्न असेल. तरीही हे त्याच्यासाठी हानिकारक नाही, कारण त्याने आपलं सर्वोत्तम दिलं आहे आणि आपण ते पाहू शकता," असं सिद्धूंनी सांगितलं आहे.
"मी त्याला सर्वोत्तम फलंदाज मानतो. एक काळ होता जेव्हा मी ट्रान्सिस्टरवर सुनील गावसकर वेस्ट इंडिजविरोधात कसं खेळतात हे ऐकायचो. ते विनाहेल्मेट वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा सामना करत असल्याने फार कौतुक वाटायचं. तो त्यांचा काळ होता. त्यांनी 15 ते 20 वर्षं वर्चस्व गाजवलं. त्यानंतर सचिन तेंडुलकर, नंतर धोनी आणि आता विराट आला. तुम्ही या चौघांकडे पाहिलंत तर मी विराटला सर्वोत्तम मानतो. त्याने तिन्ही फॉर्मेटला चांगलं आत्मसात केलं आहे," अशी कौतुकाची थाप सिद्धूंनी दिली आहे.
दरम्यान विराट कोहली सर्वोत्तम खेळाडू का आहे असंही त्यांना विचारण्यात आलं असता त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतकी वर्षं खेळणं आणि फिटनेस हे दोन मुद्दे मांडले. "त्याचं तांत्रिक ज्ञान आणि फिटनेस उत्तम आहे. जर तुम्ही या चौघांकडे पाहिलंत तर तो सर्वात जास्त फिट आहे. सचिन तेंडुलकरला करिअरमध्ये फिटनेसचा अडथळा होता. धोनी फिट आहे, पण विराट सुपर फिट आहे. त्यामुळे तो भक्कमपणे उभा आहे. त्याला इतरांच्या तुलनेत चांगली कामगिरी करण्याची संधी यामुळे मिळत आहे. जास्त काळ खेळत असल्याने ती जमेची बाजू आहे," असं ते म्हणाले.
विराट कोहली विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मैदानात परतला आहे. मुलाच्या जन्मासाठी विश्रांतीवर गेलेला विराट कोहली आयपीएलमध्ये खेळण्यासाठी आरसीबीसह चेन्नईत दाखल झाला आहे. 22 मार्चला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात पहिला सामना होणार आहे.