IPL 2024: आयपीएल हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या हंगामात क्रिकेट रसिकांचं काही खेळाडूंकडे लक्ष असणार आहे. यामध्ये मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार हार्दिक पांड्याचाही (Hardik Pandya) समावेश आहे. या हंगामात मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) जागी हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवलं आहे. विशेष म्हणजे हार्दिक पांड्याला पुन्हा संघात घेण्यासाठी मुंबई इंडियन्सने मोठी किंमत मोजली आहे. ट्रेड करत त्यांनी हार्दिकला संघात घेत थेट कर्णधार केलं आहे. यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. वर्ल्डकपमध्ये घोट्याला दुखापत झाल्यापासून हार्दिक पांड्या एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळलेला नाही. ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेलाही तो मुकला आहे. तसंच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही जाऊ शकला नाही.
मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात नोव्हेंबर महिन्यात करार झाला. ट्रेड करत मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला संघात घेतलं. विशेष म्हणजे हार्दिकला कर्णधार करण्यासाठी त्यांनी संघाला पाच वेळा आयपीएल खिताब जिंकवणाऱ्या रोहित शर्माला बाजूला केला. यावरुन चाहते चांगलेच संतापले होते. सोशल मीडियावर अनेकांनी कमेंट करत नाराजी जाहीर केली होती.
दरम्यान आयपीएल सुरु होण्याआधी हार्दिक पांड्याने आपल्या टीकाकारांना उत्तर दिलं आहे. "एक गोष्ट माझ्या चाहत्यांना माहिती नाही ते म्हणजे मी जास्त बाहेर जात नाही. मी घरातच रमणारा आहे. गेल्या तीन ते चार वर्षात मी क्वचितच घराबाहेर पडलो आहे. अगदीच गरज आहे अशा क्षणी किंवा मित्रांना काही झालं असेल तेव्हाच गेलो आहे. मला घऱात राहायला आवडतं. एक वेळ अशी होती जेव्हा मी 50 दिवस घराबाहेर पडलो नव्हतो. मी घराची लिफ्टही पाहिली नव्हती," असं हार्दिक पांड्या एका चॅट शोमध्ये म्हणाला आहे. माझ्या घरात जीम, होम थिएटर अशा सर्व गोष्टी आहेत. मला आवडणाऱ्या सर्व गोष्टी घऱात असताना बाहेर जाण्याची गरज नाही असं हार्दिक म्हणाला आहे.
हार्दिक पांड्याला यावेळी त्याच्या एका फोटोबद्दल विचारण्यात आलं, ज्यामध्ये तो सुपर कारमध्ये दिसत होता. यावर त्याने आपल्याला टेस्ट-ड्राइव्हसाठी ही कार कोणीतरी पाठवली होती असा खुलासा केला. पुढे त्याने सांगितलं की, "मी कधीच मीडियात कमेंट करत नाही. मी कधी केलेलीही नाही आणि मला काही फरक पडत नाही".
दरम्यान यावेळी हार्दिकने एक मजेशीर किस्सा सांगितला. त्याला वाटायचं सामनावीर पुरस्कारात मिळालेली बक्षिसाची रक्कम तो खेळाडू घरी घेऊन जायचा. "मला वाटायचं सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर बक्षिसाची सर्व रक्कमही मिळते. मला जेव्हा सामनावीर पुरस्कार मिळाला तेव्हा वाटलं पैसाही माझा आहे. पण हे पैसे संपूर्ण टीममध्ये वाटले जातात. शेवटी हा सांघिक खेळ आहे," असं हार्दिक पांड्या म्हणाला.