IPL 2024 : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे वर्ल्ड कप 2023 पासून मैदानाबाहेर आहे. वर्ल्ड कपदरम्यानच शमीला दुखापत झाली होती. असं असलं तरी उपांत्य पूर्व सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध शमीने सात विकेट घेतल्या होत्या. आता सोशल मीडियावर मोहम्मद शमीने त्याच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली आहे. मात्र मोहम्मद शमीला आयपीएल 2024 मध्ये खेळता येणार नाही. मात्र या पोस्टवर आता नवा वाद उफाळून आला आहे.
इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. आयपीएलचा पहिला सामना 22 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वीच मोहम्मद शमीने सोशल मीडियावर त्याच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. मात्र यावेळी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याशी संबंधित कमेंट लाइक करून खळबळ उडवून दिली आहे.
काय होती मोहम्मद शमीची पोस्ट?
मोहम्मद शमीने सोशल मीडियावर पोस्ट करत त्याच्या फिटनेसबाबत माहिती दिली. "सर्वांना नमस्कार! मला तुम्हाला माझ्या रिकवरीबद्दल सर्व अपडेट द्यायचे आहेत. माझी शस्त्रक्रिया करून आणि माझे टाके नुकतेच काढून 15 दिवस झाले आहेत. मी केलेल्या प्रगतीबद्दल मी कृतज्ञ आहे आणि रिकवरीच्या पुढील टप्प्यावर जाण्यासाठी मी तयार आहे," असे शमीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. मात्र एका चाहत्याने या पोस्टवर हार्दिक पांड्याबाबत केलेल्या कमेंटवर मोहम्मद शमीने प्रतिक्रिया दिल्याने हा वाद सुरु झाला आहे.
Shami bhai gave his 100 percent even when he was in pain during worldcup, then there is one chapri kalu who shown fake injury to keep himself available for IPL
— Ctrl C Ctrl Memes (@Ctrlmemes_) March 13, 2024
मोहम्मद शमी दुखापत होऊनही वर्ल्ड कप खेळत होता, त्यानंतर एका खेळाडूने आयपीएलमध्ये खेळण्यासाठी वर्ल्डकपदरम्यान दुखापत झाल्याचे नाटक केले, असे या युजरने म्हटलं आहे. 'शमी भाईने वर्ल्डकपदरम्यान वेदना होत असतानाही त्यांचे 100 टक्के दिले. त्यानंतर एक छपरी आहे ज्याने स्वत:ला आयपीएल खेळण्यासाठी दुखापतीचा बनाव रचला,' असे या युजरने म्हटलं आहे.
शमीने ही कमेंट लाईक करताच ती व्हायरल झाली. अनेक चाहत्यांना आश्चर्य वाटले की शमी हे कसे करू शकतो. दुसरीकडे, गेल्या आयपीएलदरम्यान हार्दिक आणि शमीमध्ये वाद झाला होता. हार्दिक पांड्याने मोहम्मद शमीला झेल सोडल्याबद्दल शिवीगाळ केली होती. तेव्हा शमीने स्पष्टपणे मला अशा प्रतिक्रिया आवडत नाहीत, असे सांगितले होते. त्यानंतर संघ व्यवस्थापनाला हस्तक्षेप करून प्रकरण सोडवावे लागले.