'साक्षी सोडल्यास मीच अशी एकमेव व्यक्ती ज्याला माही भाईने..'; जडेजाच्या विधानाने धोनीलाही हसू अनावर

IPL 2024 CSK Ravindra Jadeja Comment About MS Dhoni Wife: एका जाहीर कार्यक्रमामध्ये चेन्नईच्या संघातील सहकाऱ्यांबरोबर मुलाखत देताना रविंद्र जडेजाने हे विधान केलं असून सध्या या विधानाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 30, 2024, 01:03 PM IST
'साक्षी सोडल्यास मीच अशी एकमेव व्यक्ती ज्याला माही भाईने..'; जडेजाच्या विधानाने धोनीलाही हसू अनावर title=
धोनीलाही हसू अनावर झालं

IPL 2024 CSK Ravindra Jadeja Comment About MS Dhoni Wife: चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजा हा त्याच्या मैदानातील कामगिरीबरोबरच मस्तीखोरपणासाठी आणि खोचक प्रतिक्रियांसाठीही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमामध्ये जडेजाने आपल्या अशाच मजेदार कमेंटची झलक दाखवली आणि सगळेच उपस्थित हसू लागले. विशेष म्हणजे ही प्रतिक्रिया जडेजाच्या निकटवर्तीय खेळाडूंपैकी एक असलेल्या महेंद्रसिंह धोनीबद्दल आहे. चेन्नईच्या माजी कर्णधाराच्या पत्नीचा म्हणजेच साक्षी धोनीचा उल्लेख करत जडेजाने ही प्रतिक्रिया नोंदवली.

तेव्हा धोनीने जडेजाला उचलून घेतलेलं

2023 सालच्या इंडियन प्रिमिअर लीगच्या अंतिम सामन्यामध्ये जडेजाने चिवट फलंदाजी करत संघाला पाचव्यांदा जेतेपद मिळवून दिलं. जडेजाच्या खेळीमुळे विजय मिळवल्यानंतर भावूक झालेल्या धोनीने डगआऊटजवळ जडेजाला उचलून घेतलं होतं. धोनीने जडेजाला उचलून घेतल्याचा हा क्षण सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या क्षणाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केले होते.

साक्षी भाभी सोडल्यास मीच...

गुजरात टायटन्सविरुद्धच्या आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यानंतरच्या याच क्षणाचा संदर्भ देत जडेजाने धोनीच्या पत्नीचा उल्लेख केला. एका मुलाखतीमध्ये चेन्नईच्या संघ सहकाऱ्यांबरोबर वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करताना जडेजाने एक मजेदार वक्तव्य केलं. "मला वाटतं साक्षी वहिनीनंतर मीच एकमेव व्यक्ती असेल जिला धोनी भाईने उचलून घेतलं असेल," असं जडेजा म्हणाला. जडेजाचं हे विधान ऐकून धोनीसहीत सारेचजण हसू लागले.

पॉइण्ट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी, ऋतुराजचं ट्रेनिंग

चेन्नईच्या यंदाच्या पर्वातील कामगिरीबद्दल बोलायचं झाल्यास धोनीकडून कर्णधारपद ऋतुराज गायकडवाडकडे सोपवण्यात आल्यानंतर संघ एकदाही पराभूत झालेला नाही. आधी चेन्नईच्या संघाने बंगळुरुच्या संघाला पराभूत केलं आणि त्यानंतर गुजरात टायटन्सच्या संघाला पराभूत केलं. मोठ्या फरकाने आपले दोन्ही सामने जिंकून चेन्नईचा संघ पहिल्या 10 सामन्यानंतर पॉइण्ट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी आहे. चेन्नईचा पुढील सामना रविवारी, 31 मार्च रोजी विशाखापट्टणम येथे दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. यंदाचं आयपीएल हे धोनीचं शेवटचं आयपीएल असल्याचं सांगितलं जात आहे. त्याचाच भाग म्हणून संघाचं कर्णधारपद धोनीकडून ऋतुराजकडे सोपवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली यंदाच्या पर्वात ऋतुराजला कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी प्रशिक्षण देण्याचा संघ व्यवस्थापनाचा विचार आहे. मैदानामध्येही ऋतुराज अनेक निर्णयांसाठी धोनीची मदत घेताना दिसत आहे.