IPL 2024 Auction Punjab Purchases Wrong Player: इंडियन प्रीमिअर लीगच्या म्हणजेच आयपीएलच्या 2024 च्या लिलावादरम्यान पंजाब किंग्जच्या संघाची मालकीण प्रिती झिंटाच्या एका चुकीचा फटका संघाला बसला आहे. दुबईमधील लिलावामध्ये सहभागी झालेल्या प्रितीने घाईघाईत एका चुकीच्या खेळाडूलाच संघात घेतलं. खेळाडूची ओळख पटवण्यात पंजाब किंग्जच्या संघाचा गोंधळ झाला अन् ही नसती उठाठेव झाली. मात्र या गोंधळामुळे त्या खेळाडूला पंजाबने विकत घेतलं आहे तो ही आता संभ्रमात आहे.
आयपीएलच्या लिलावामध्ये खेळाडूंसाठी बोली लावणारी टीम ही लिलावात असलेल्या सर्व खेळाडूंबद्दलची माहिती आणि आकडेवारीबद्दल अगदी अपडेटेड असते. कोणत्या खेळाडूवर बोली लावायची आणि कोणावर नाही हे संघ आधीच ठरवून आलेले असतात. मात्र नेस वाडिया आणि प्रिती झिंटाच्या नेतृत्वाखालील पंजाबच्या टेबलवरील बोली लावणाऱ्या टीमचा लिलावादरम्यान ऐनवेळी गोंधळ जाला. छत्तीसगढमधील शशांक सिंहला पंजाबने चुकून विकत घेतलं. मात्र आपली चूक लक्षात आल्यानंतर पंजाबने चुकून आपल्याकडून ही खरेदी झाल्याचं कबुल केलं. लिलावादरम्यान शशांक सिंहवर बोली लावण्यास सुरुवात झाली तेव्हा त्याची बेस प्राइज 20 लाख होती. आपल्या टेबलवरील इतरांशी चर्चा करुन प्रितीने शशांकला विकत घेण्यासाठी फ्लॅग वर उचलला. इतर कोणत्याही संघाने शशांकवर बोली न लावल्याने शशांक पंजाबच्या संघाला बेस प्राइजमध्ये विकला गेला अशी घोषणा हातोडा आपटत ऑक्शनरने केली.
मात्र पुढील खेळाडूचं नाव घोषित झालं तेव्हा पंजाबला आपली चूक लक्षात आली. तनय त्यागराजनच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आपली चूक लक्षात आल्यावर पंजाब किंग्जच्या संघाने चूक सुधारण्यासाठी ऑक्शनर मल्लिका सागर यांच्याकडे मागणी केली. आपला खेळाडू विकत घेण्याचा निर्णय मागे घ्यायचा आहे असं पंजाबच्या संघ व्यवस्थापनाने ऑक्शनर मल्लिका यांना कळवलं. मात्र पंजाबने विकत घेतलेल्या शशांक सिंहला पुन्हा अनसोल्ड म्हणजेच विकला न गेलेला खेळाडू म्हणून टॅग करण्यास ऑक्शनर मल्लिका यांनी नकार दिला. लिलावामध्ये शशांक ऑलरेडी सोल्ड म्हणून पंजाबच्या संघात त्याचा समावेश करण्यात आलेला म्हणूनच हा निर्णय मागे घेता येणार नाही असं ऑक्शनर मल्लिका यांनी सांगितलं. आम्हाला शशांकला विकत घ्यायचं नव्हतं हे पंजाबचं म्हणणं मल्लिका यांनी ऐकून घेतलं नाही.
पंजाबच्या या चुकीमुळे आता त्यांना इच्छा नसतानाही शशांक सिंहला संघात घ्यावं लागलं आहे. आता पुढील टप्प्यात पंजाब शशांकला कायम ठेवणार की संधी मिळाल्यास करारमुक्त करणार हे येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये कळेलच.