IPL 2024 Auction Anil Kumble No Nonsense Response: भारतीय संघाचा माजी कर्णधार तसेच प्रशिक्षक राहिलेल्या अनिल कुंबळेनं इंडियन प्रीमिअर लीगच्या 2024 च्या लिलावामध्ये ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला मिळालेल्या अनपेक्षित रक्कमेबद्दल आपलं रोखठोक मत व्यक्त केलं आहे. ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादच्या संघाने तब्बल 20 कोटी 50 लाख रुपयांची बोली लावून संघात घेतलं. या लिलावामध्ये आयपीएलच्या 16 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यादांचा कोणत्याही खेळाडूला 20 कोटींहून अधिकची बोली मिळाली. अर्थात हा विक्रम तासाभरामध्ये मिलेच मार्शने मोडून काढला. मार्शला कोलकात्याच्या संघाने 24.75 कोटींना संघात घेतलं.
पॅट कमिन्सला आपल्या संघात घेण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद (SRH), मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये स्पर्धा पाहायला मिळाली. या लिलावात कमिन्सला मिळालेली किंमत पाहून कुंबळेने, "ही फार जास्त रक्कम आहे. त्याला 20 कोटी मिळतील असं वाटलं नव्हतं. आम्हाला ठाऊक होतं की त्याची विक्रमी किंमतीला विक्री होईल पण 20 कोटी फार झाले. त्याने विक्रम नोंदवला," अशी प्रतिक्रिया जीओ सिनेमाशी बोलताना व्यक्त केली.
कमिन्सला एवढी मोठी रक्कम देऊन सनरायझर्सने विकत का घेतलं असावं याबद्दलची शक्यता कुंबळेनं बोलून दाखवली. "कदाचित सनरायझर्स हैदराबादचा संघ कर्णधाराच्या शोधात असावा. त्यामुळेच त्याला (पॅट कमिन्सला) संघात घेण्यासाठी ते इतके उतावळे झाले होते," असं कुंबळे म्हणाला.
"कदाचित आरसीबीसुद्धा दिर्घकालीन कर्णधार म्हणून त्याच्यावर बोली लावत होते. पॅट कमिन्सला माझ्या शुभेच्छा. त्याने 3 चषक जिंकले आहेत. पण आयपीएल जिंकणं म्हणजे अगदी आयसिंग ऑन द केक म्हणतात तसा प्रकार ठरेल," असं कुंबळे म्हणाले. इंग्लंडचा वर्ड कप जिंकवून देणारा कर्णधार इयन मॉर्गनने राष्ट्रीय संघांतून खेळताना संघाचं नेतृत्व करत असताना मिळालेल्या यशामुळेच पॅट कमिन्सला एवढी मोठी रक्कम मिळाल्याचं मत व्यक्त केलं आहे.
"मागील साडेतीन वर्षांपासून पॅट कमिन्सकडे खेळाडू म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. गोलंदाजाबरोबरच तो उत्तम नेतृत्व करु शकतो असं दिसून आलं आहे. त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप जिंकली. इंग्लंडविरुद्ध अॅशेज मालिका जिंकली आणि त्यानंतर त्याने एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्ड कप स्पर्धेत संघाचं नेतृत्व करत जेतेपद पटकावलं," असं मॉर्गन म्हणाला. "त्यामुळेच सध्याची त्याची कामगिरी आणि त्याच्यावर असेलला विश्वास यामुळे त्याला एवढी मोठी बोली मिळाली. तसेच मागणी आणि पुरवठा हा भाग सुद्धा इथे महत्त्वाचा ठरला. अनेक संघ सध्या कर्णधाराच्या शोधात आहेत. केवळ मैदानात नाही तर ड्रेसिंग रुममध्येही नेतृत्व करणारं कोणीतरी हवं. त्यामुळे पॅट कमिन्सनची किंमत योग्य वाटते," असं मत मॉर्गनने व्यक्त केलं.