मुंबई : आयपीएल ही क्रिकेट विश्वातील लोकप्रिय स्पर्धा आहे. या स्पर्धेला वादाची किनारही आहे. काही वर्षांपूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेल्या हरभजन सिंगने पंजाबच्या एस श्रीसंतला कानफाटीत मारली होती. यावरुन वादाला तोंड फुटलं होतं. हरभजनवर त्याने केलेल्या कृतीमुळे बंदी घालण्यात आली होती. आता या सर्व प्रकरणावर श्रीसंतने प्रतिक्रिया दिली आहे. (ipl 2022 i still dont know why harbhajan singh slapped me said s sreesanth)
"हरभजनने मला कानफाटीत का मारली हे मला आजपर्यंत समजलं नाही. मी गेल्या 2 वर्षांपासून आयपीएलमध्ये कमबॅकसाठी प्रयत्न करत होतो. पण कदाचित वाढत्या वयामुळे मला संधी मिळू शकली नाही. अनेक फ्रँचायजी युवा खेळाडूंना संधी देतेय आणि ते त्या संधीचं सोनं करतायेत, याचा मला आनंद आहे", असं श्रीसंत म्हणाला. तो दैनिक जागरणसह बोलत होता.
या वादानंतर हरभजनवर त्या संपूर्ण मोसमासाठी बंदी टाकण्यात आली. तसेच चौकशीनतंर हरभजनवर 5 एकदिवसीय सामन्यांचीही बंदी टाकली गेली. मात्र हरभजन हा माझ्या मोठ्या भावासारखा आहे, असं म्हणत श्रीसंतने त्याच्या विरुद्ध तक्रार करण्यास नकार दिला होता.