IPL 2021 | 'कॅप्टन कूल'ची दिल्ली विरुद्ध ट्रेड मार्क खेळी, 6 चेंडूच्या खेळीत 6 शानदार रेकॉर्ड्स

महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) दिल्ली विरुद्धच्या (DC) पहिल्या क्वालिफायर सामन्यात (IPL 2021 Qualifier 1) निर्णायक क्षणी नाबाद 18 धावांची खेळी करत चेन्नईला विजय मिळवून दिला.

Updated: Oct 11, 2021, 06:18 PM IST
IPL 2021 | 'कॅप्टन कूल'ची दिल्ली विरुद्ध ट्रेड मार्क खेळी, 6 चेंडूच्या खेळीत 6 शानदार रेकॉर्ड्स title=

दुबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021 Qualifier 1) पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) 4 विकेट्सने दमदार विजय मिळवला. या सामन्यात कर्णधार महेंद्रसिंह धोनीने चौकार मारत नेहमीच्या शैलीत चेन्नईला विजय मिळवून दिला. (ipl 2021 qualifier 1 dc vs csk captain mahendra singh dhoni makes 6 records with 18 runs innings against delhi capital at  Dubai International Cricket Stadium)

धोनीने या सामन्यात निर्णायक क्षणी रवींद्र जाडेजाच्या सोबतीने चेन्नईला विजय मिळवून दिला. धोनीने या सामन्यात 6 चेंडूत नाबाद 18 धावांची खेळी केली. या खेळीसह धोनीने सहा रेकॉर्ड केले. धोनीने नेमके कोणते रेकॉर्ड केले, हे आपण जाणून घेऊयात. 

धोनीने दिल्लीविरुद्ध 300 च्या स्ट्राईक रेटने 6 चेंडूत 18 धावा केल्या. धोनीची ही आयपीएलमधील सर्वाधिक स्ट्राईक रेट असलेली खेळी ठरली. धोनीने याआधी 2012 मध्ये मुंबई विरुद्ध 281.25 च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्या होत्या. 

दिल्लीचा पराभव करत चेन्नईने अंतिम फेरीत धडक मारली. यासह चेन्नईची अंतिम सामन्यात पोहचण्याची 9 वी तर धोनीची 10 वी वेळ ठरली. धोनीने आतापर्यंत 8 वेळा चेन्नईकडून अंतिम सामना खेळला आहे. तर पुण्याकडून एकदा फायनलमध्ये खेळला आहे. तर या मोसमातील अंतिम सामना हा त्याच्या कारकिर्दीतील 10 वा अंतिम सामना ठरणार आहे.

दिल्लीला पराभूत केल्याने चेन्नई फायनलमध्ये पोहचली. यासह धोनी पहिलाच असा कर्णधार ठरणार आहे, जो एका संघाचं तब्बल 9 व्यांदा आयपीएलमध्ये नेतृत्व करणार आहे. धोनीनंतर या यादीत मुंबईचा कॅप्टन रोहित शर्मा आहे. रोहितने 5 वेळा फायनलमध्ये कॅप्टन्सी केली आहे. विशेष म्हणजे या 5ही सामन्यात रोहितने मुंबईला ट्रॉफी मिळवून दिली आहे. 

दिल्लीला पराभूत करत चेन्नईने अंतिम सामन्यात धडक मारली. यासह धोनी आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहचणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरणार आहे. धोनी वयाच्या 40 वर्ष 100 व्या दिवशी अंतिम सामना खेळणार आहे. यासह धोनी वयाच्या बाबतीत इमरान ताहिरचा रेकॉर्ड ब्रेक करेल. ताहीर 2019 मध्ये वयाच्या 40 वर्ष 69 व्या दिवशी अंतिम सामना खेळला होता.

धोनी आयपीएलमध्ये सर्वाधिक प्लेऑफ सामने (Knock Out Matches) खेळणारा खेळाडू ठरला आहे. दिल्ली विरुद्धचा पहिला क्वालिफायर सामना हा धोनीच्या आयपीएल कारकिर्दीतील 25 वा सामना ठरला. तर त्या खालोखाल 24 सामन्यांसह सुरेश रैना दुसऱ्या क्रमांकावर आहे.

चेन्नईला विजयासाठी 20 व्या ओव्हरमध्ये 13 धावांची आवश्यकता होती. या 13 धावा चेन्नईने 4 चेंडूत पूर्ण केल्या. यासह धोनी सर्वाधिक 7 वेळा शेवटच्या ओव्हरमध्ये 10 किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा पाठलाग करणारा (दुसऱ्या डावात) खेळाडू ठरला. विशेष म्हणजे धोनी हा 25 वेळा नॉटआऊट राहिला आहे.