यूएई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 34 वा सामना आज (ipl 2021 Match 34) खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आमनेसामने असणार आहेत. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी शेख झायेद स्टेडिमयममध्ये (Sheikh Zayed Stadium) सुरुवात होणार आहे. (ipl 2021 phase 2 today 23 September match mi vs kkr head to head records see statistics)
मुंबईची दुसऱ्या टप्प्यातील सुरुवात पराभवाने झाली.तर कोलकाताने बंगळुरुचा 9विकेट्सने धुव्वा उडवला होता. त्यामुळे कोलकाताचा विश्वास दुणावलेला आहे. कोलकाताचा या सामना जिंकून विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा प्रयत्न असेल. तर दुसऱ्या बाजूला मुंबईचा जोरदार कमबॅक करण्याचा प्रयत्न असणार आहे.
पॉइंट्सटेबलमध्ये मुंबई चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबईने आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. त्यापैकी 4 सामन्यात विजय आणि तितक्याच मॅचेसमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. तर कोलकाताने 8 पैकी 3 मॅचेसमध्ये प्रतिस्पर्धी संघाला पराभूत केलंय.
तर 5 मॅचेसमध्ये पराभव झाला आहे. कोलकाता 6 गुणांसह अंकतालिकेत 6 व्या क्रमांकावर आहे. केकेआरसमोर मुंबईचं मजबूत आव्हान असणार आहे. कारण मुंबई प्रत्येक बाबतीत कोलकातावर वरचढ आहे.
हेड टू हेड आकडेवारी
हे दोन्ही संघ आयपीएलच्या इतिहासात एकूण 28 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये मुंबईने कोलकातावर एकतर्फी वर्चस्व गाजवलंय. मुंबईने 28 पैकी 22 सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे. तर कोलकाताला केवळ 6 मॅचेसमध्येच मुंबईला पराभूत करता आलंय. आयपीएलच्या 13 व्या मोसमातील दोन्ही सामन्यात मुंबईने कोलकाताचा पराभव केला.
शेख झायेद स्टेडिमयमवर दोन्ही टीम 3 वेळा खेळले आहेत. मुंबईने या 3 पैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे. तर कोलकाताही एकदा यशस्वी ठरलीये. त्यामुळे एकूण आकडेवारी आणि या मैदानातील आकडेवारी दोन्ही बाबतीत मुंबईचाच बोलबाला आहे.
या मोसमातील पहिल्या टप्प्यात दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात मुंबईने कोलकाताला विजयासाठी 153 धावांचे आव्हान दिले होते. मात्र कोलकाताला मुंबईच्या गोलंदाजांनी 142 धावांवरच रोखलं. अशाप्रकारे मुंबईने 10 विकेटने विजय मिळवला होता. त्यामुळे कोलकाता या पराभवाचा वचपा घेणार, की मुंबई पुन्हा एकदा कोलकाताला उपट देणार, याकडे क्रिकेट रसिकाचं लक्ष असणार आहे.