IPL 2021 FINAL | CSK आणि KKR फायनलमध्ये दुसऱ्यांदा आमनेसामने, 9 वर्षांपूर्वी असा रंगला होता सामना

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचं जेतेपद कोण पटकावणार? कोणता संघ लुटणार विजयाचं सोनं

Updated: Oct 14, 2021, 09:51 PM IST
IPL 2021 FINAL | CSK आणि KKR फायनलमध्ये दुसऱ्यांदा आमनेसामने, 9 वर्षांपूर्वी असा रंगला होता सामना title=

दुबई : आयपीएलच्या चौदाव्या हंगामात महेंद्र सिंग धोणीची चेन्नई सुपर किंग्स आणि इयान मॉर्गनची कोलकाता नाईट रायडर्स विजेतेपदासाठी भिडणार आहेत. चुरशीच्या लढती कोलकाताने दिल्ली कॅपिटल्सवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर चेन्नईने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला बाहेरचा रस्ता दाखवला. चेन्नईची टीम तब्बल नवव्यांदा तर कोलकाताने तिसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. 

9 वर्षानंतर अंतिम फेरीत 

चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स तब्बल नऊ वर्षांनंतर अंतिम फेरीत एकमेकांना भिडणार आहेत. 2012 मध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नईला नमवत आयपीएलचं जेतेपद आपल्या नावावर केलं होतं. 

चेन्नईची टॉस जिंकून फलंदाजी

चेन्नईच्या एमएस चिंदमबरम स्टेडिअमवर रंगलेल्या या सामन्यात CSK कर्णधार एमएस धोणीने टॉस जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईचे सलामीवीर मुरली विजय आणि माईक हसीने संघाला दमदार सुरुवात करुन दिली. पहिल्या विकेटसाठी या जोडीने 87 रन्सची पार्टनरशीप केली. रजत भाटियाने मुरली विजयची विकेट घेतली, त्याने 32 चेंडूत 42 धावा केल्या.

रैनाची धुवाँधार फलंदाजी

मुरली विजय बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या सुरेश रैनाने धुवाँधार फलंदाजी करत संघाला 17 ओव्हरमध्ये 160 धावांचा टप्पा गाठून दिला. धोणी आणि रैनाने धावांची बरसात करत 190 धावांची दमदार मजल मारली. रैनाने 38 चेंडूत 3 चौकार आणि तब्बल 5 षटकार मारत 73 धावा केल्या. चेन्नईने कोलकातासमोर विजयासाठी मोठं आव्हान ठेवलं.

कोलकाताची खराब सुरुवात

विजयासाठी 191 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानावर उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सच्या डावाची सुरुवात गौतम गंभीर आणि मनविंदर बिस्ला जोडीने केली. पण कोलकाताची सुरुवात निराशाजनक झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये गंभीर 2 धावांवर क्लीन बोल्ड झाला.

बिस्ला-कॅलिस जोडीची पार्टनरशिप

गंभीर बाद झाल्यानंतर मनविंदर बैसला आण जॅक कॅलिस जोडीने चेन्नईच्या गोलंदाजांना अक्षरश: रडवलं. दुसऱ्या विकेटसाठी या जोडीने 136 धावांची पार्टनरशीप केली. बिस्लाने अवघ्या 27 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. शतकाकडे वाटचाल करणाऱ्या बिस्लाला एल्बी मॉर्केलने पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. बिस्लाने 48 चेंडूत 8 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 879 धावा केल्या.

कोलकाताची मधली फळी गडगडली

बिस्ला बाद होताच कोलकाताची मधली फळी गडगडली. लक्ष्मी रतन शुक्ला, युसुफ पठाण झटपट बाद झाले. तेव्हा कोलकाताची धावसंख्या 17 ओव्हरमध्ये 4 विकेटवर 164 अशी होती. 17 चेंडूत कोलकाताला विजयासाठी 26 धावांची आवश्यकता होती. कॅलिस बाद झाल्यानंतर मनोज तिवारी आणि शाकिब अल हसनने सामन्याची सूत्र आपल्या हातात घेतली. ब्राव्होच्या शेवटच्या षटकात मनोज तिवारीने सलग दोन चौकार मारत कोलकाताच्या पहिल्या आयपीएल जेतेपदावर शिक्कामोर्तब केलं.

चेन्नईत 2012 चे 6 खेळाडू 

2012 आयपीएलमध्ये चेन्नई संघातून खेळलेले 6 खेळाडू आजही संघासोबत आहेत. यात एमएस धोई, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राओ हे यंदाचा आयपीएलही खेळतायत. तर कोलकाता संघात त्यावेळचे शाकिब अल हसन आणि सुनील नरेन आहेत.