दुबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 13 व्या सत्राचे संपूर्ण वेळापत्रक आज जाहीर केले जाईल. आयपीएलला आता फक्त 2 आठवडे शिल्लक आहेत, अशा परिस्थितीत सर्व फ्रेंचायझी वेळापत्रकनुसार त्यांच्या योजना तयार करतील. त्याआधी शनिवारी आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल म्हणाले की, रविवारी म्हणजेच ६ सप्टेंबर रोजी आयपीएलचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२० ची सुरुवात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील सामन्याने होणार आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार, पहिला सामना बदलण्याची कोणतीही योजना नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखालील संघांमध्ये पहिला सामना खेळवणार आहे. गेल्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्स विजयी संघ तर चेन्नई सुपर किंग्ज उपविजेता होता.
यावेळी ही स्पर्धा 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत खेळली जाईल. आयपीएलचे 60 सामने दुबई, अबूधाबी आणि शारजाह अशा तीन ठिकाणी 53 दिवस खेळले जातील.
यापूर्वी आयपीएलच्या वेळापत्रकाबाबत चर्चा सुरु होत्या. बीसीसीआय वेळापत्रक जाहीर करण्यास उशीर का करीत आहे याबाबत अनेकांच्या मनात शंका होती.
यावर्षी आयपीएल 29 मार्चपासून खेळली जाणार होती, परंतु कोरोना संकटामुळे लॉकडाऊन लागल्यानंतर ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. भारतात स्पर्धा आजोजित करणं शक्य नसल्याने यूएईमध्ये हे सामने होणार आहेत.