नवी दिल्ली : आयपीएलच्या टीमचा मालक होण्याची इच्छा असलेल्या गौतम गंभीरला धक्का लागला आहे. गौतम गंभीर हा आयपीएलच्या दिल्ली टीममध्ये १० टक्के हिस्सा घेईल, असं सांगतिलं जात होतं. पण दिल्ली टीमच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार हा करार होताना दिसत नाहीये. दिल्लीच्या टीमची मालकी जीएमआर आणि जेएसडब्ल्यू यांच्याकडे आहे.
दिल्ली कॅपिटल्स टीमचा अधिकारी म्हणाला, 'गौतम गंभीर बोर्डावर येईल अशी चर्चा होती. आताही ही चर्चाच आहे. पण या मोसमात गंभीर टीमचा सहमालक होणं ९९.९९ टक्के अशक्य आहे.'
गौतम गंभीर हा दिल्ली कॅपिटल्स टीमचा कर्णधारही राहिला होता. तसंच त्याआधी गंभीर कर्णधार असताना कोलकात्याने दोन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली होती. दिल्लीच्या टीमचा सहमालक नाही तर सल्लागार म्हणून गंभीर दिसेल, अशीही शक्यता वर्तवली गेली होती. सौरव गांगुलीने राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त आहे. बीसीसीआयचा अध्यक्ष झाल्यामुळे गांगुलीला हे पद सोडावं लागलं होतं.
गंभीरला सल्लागार बनवण्याबाबतही विचार झालेला नाही, असं अधिकाऱ्याने सांगितलं. प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि त्याचे सहकारी प्रशिक्षक अशी मजबूत फळी आमच्याकडे आहे. तसंच गंभीर खासदार असल्यामुळे तो येऊ शकतो का नाही, हेदेखील आम्हाला माहिती नाही, असं दिल्ली टीमचा अधिकारी म्हणाला.