IPL 2020 : चेन्नईला मोठा धक्का, खेळाडू आणि सहकाऱ्यांना कोरोना

आयपीएल सुरू होण्याआधीच चेन्नईच्या टीमला मोठा धक्का बसला आहे. 

Updated: Aug 28, 2020, 06:24 PM IST
IPL 2020 : चेन्नईला मोठा धक्का, खेळाडू आणि सहकाऱ्यांना कोरोना title=

दुबई : आयपीएल सुरू होण्याआधीच चेन्नईच्या टीमला मोठा धक्का बसला आहे. चेन्नईच्या टीममधल्या १३ जणांना कोरोना झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातला १ खेळाडू बॉलर, तर उरलेले १२ जण सपोर्ट स्टाफमधले असल्याचं सांगितलं जात आहे. इंडिया टुडेने याबाबतचं वृत्त दिलं आहे. कोरोना झालेल्या सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याचंही सांगितलं जात आहे. कोरोना झालेल्या सगळ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. 

दुबईमध्ये पोहोचल्यानंतर चेन्नईच्या टीमची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये १३ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे आता चेन्नईच्या टीमला सरावालाही सुरूवात करता येणार नाही. 

२१ ऑगस्टला चेन्नईची टीम दुबईला पोहोचली. ६ दिवसांच्या विलगीकरणानंतर म्हणजेच २८ ऑगस्टला टीमच्या ट्रेनिंगला सुरूवात होणार होती, पण टीममध्ये कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यामुळे आता १ सप्टेंबरपासून ट्रेनिंग सुरू होईल, असं सांगण्यात आलं आहे. आयपीएलसाठी काही टीमच्या ट्रेनिंगला सुरुवातही झाली आहे, तर काही टीमचं ट्रेनिंग लवकरच सुरू होणार आहे. 

आयपीएलसाठीच्या नियमांनुसार युएईमध्ये दाखल झाल्यानंतर टीमशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाला कोरोनाची चाचणी करणं बंधनकारक आहे. युएईमध्ये दाखल झाल्यानंतर पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या दिवशी कोरोना टेस्ट कराव्या लागतात. या कालावधीमध्ये प्रत्येकाला क्वारंटाईन व्हावं लागतं, तसंच या तिन्ही टेस्ट निगेटिव्ह येणं गरजेचं असतं. 

युएईमध्ये येण्याआधी चेन्नईच्या टीमचे काही खेळाडू चेन्नईमध्ये ५ दिवसांच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये एमएस धोनी, सुरेश रैना, दीपक चहर, अंबाती रायडू, पियुष चावला आणि शार्दुल ठाकूर आणि बॉलिंग प्रशिक्षक एल बालाजी सहभागी झाले होते.