IPL 2019: एकही सामना न जिंकणाऱ्या बंगळुरूने मोडलं मुंबईचं रेकॉर्ड

यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या बंगळुरूला एकही सामना जिंकता आलेला नाही.

Updated: Apr 8, 2019, 10:42 PM IST
IPL 2019: एकही सामना न जिंकणाऱ्या बंगळुरूने मोडलं मुंबईचं रेकॉर्ड title=

बंगळुरू : यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या बंगळुरूला एकही सामना जिंकता आलेला नाही. आत्तापर्यंत खेळलेल्या सगळ्या ६ मॅचमध्ये बंगळुरूचा पराभव झाला आहे. यामुळे बंगळुरूने आयपीएलच्या एका मोसमात सुरुवातीच्या सर्वाधिक मॅच हरण्याच्या दिल्लीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. दिल्लीने २०१३ साली सुरुवातीच्या ६ मॅच गमावल्या होत्या.

बंगळुरूच्या टीमने दिल्लीच्या या रेकॉर्डशी बरोबरी केली असली तरी त्यांनी हैदराबाद(डेक्कन चार्जर्स) आणि मुंबईचं रेकॉर्ड मोडलं आहे. हैदराबादने २०१२ साली सुरुवातीच्या ५ मॅच गमावल्या होत्या. तर मुंबईलाही २०१२ साली सुरुवातीच्या ५ मॅच गमवाव्या लागल्या होत्या. २००८ आणि २०१५ साली मुंबईच्या टीमला सुरुवातीच्या ४ मॅच जिंकता आल्या नव्हत्या.

बंगळुरूची पुढची मॅच आता १३ एप्रिलला पंजाबविरुद्ध होणार आहे. या मोसमात पंजाबच्याच टीमने बंगळुरूचा पराभव केलेला नाही. जर पंजाबच्या टीमने बंगळुरूचा पराभव केला तर आयपीएल इतिहासात सुरुवातीच्या सर्वाधिक मॅच गमावण्याचा विक्रम बंगळुरूच्या नावावर होईल.

सुरुवातीच्या ६ मॅच हरल्यामुळे बंगळुरूचं आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये जायचं आव्हान खडतर झालं आहे. आता प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी बंगळुरूच्या टीमला पुढच्या आठही मॅच जिंकाव्या लागणार आहेत. हा आयपीएलचा १२वा मोसम आहे. याआधीच्या ११ मोसमांमध्ये बंगळुरूची टीम ५ वेळा नॉक आऊटमध्ये गेली आहे. तर ३ वेळा बंगळुरूच्या टीमने फायनल गाठली आहे. पण एकदाही बंगळुरूच्या टीमला आयपीएल जिंकता आलेली नाही.