मोहाली : आयपीएल २०१९ मध्ये सोमवारी दिल्ली विरुद्ध पंजाब या दोन संघांमध्ये मोहाली येथे खेळण्यात आलेल्या सामन्यात पंजाबच्या संघाला विजय मिळाला. या विजयात महत्त्वाची भूमिका निभावली ती म्हणजे पंजाबच्या संघातील गोलंदाजांनी. यंदाच्या आयपीएलच्या हंगामातील पहिली हॅटट्रिकही याच सामन्यात पाहायला मिळाली. सॅम करनच्या हॅटट्रिकमुळे क्रीडारसिकांमध्येही प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. त्याच्या भेदक गोलंदाजीचा मारा खऱ्या अर्थाने दिल्लीवर भारी पडला असंच म्हणावं लागेल. सॅमच्या या कामगिरीचा उत्साह सामन्याच्या शेवटीडी पाहायला मिळाला, ज्याचा व्हिडिओ आयपीएलच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुनही पोस्ट करण्यात आला.
सॅम आणि संघातील इतर गोलंदाजांच्या बळावर पंजाबच्या संघाला मिळालेला हा विजय संघाची मालक प्रिती झिंटा हिच्या चेहऱ्यावरही पाहायला मिळाला. आपला संघ जिंकल्याच्या आनंदाच्या भरात तिने मैदानातच सॅमसोबत अस्सल पंजाबी शैलीत भांगडा या नृत्याच्या काही स्टेप केल्या. प्रितीचा हा अंदाज तिच्या संघातील खेळाडून आणि मैदानावर उपस्थित क्रीडारसिकांचा उत्साहा आणखी द्वीगुणित करुन गेला.
Some bhangra moves there, courtesy @realpreityzinta & @CurranSM pic.twitter.com/VAeXq3I07o
— IndianPremierLeague (@IPL) April 1, 2019
सॅम करनने २.२ षटकांमध्ये ११ धावा देत एकूण चार गडी बाद केले. तर दुसरीकडून त्याला मोहम्मद शमी आणि आर.अश्विन या खेळाडूंची साथ मिळाली. या दोघांनीही विरोधी संघातील प्रत्येकी दोन गडी बाद केले. पंजाबच्या संघाने त्यांच्या गोलंदाजीच्या बळावर दिल्लीच्या संघाला अवघ्या १५२ धावांवर रोखलं. १६७ धावांचा पाठलाग करत एकोणीसाव्या षटकातच दिल्लीचा संपूर्ण संघ तंबूत परतला. संघाच्या या कामगिरीबद्दल प्रितीने प्रत्येक खेळाडूला शुभेच्छा देत अनोख्या अंदाजात आनंद व्यक्त केला.