लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर बनवलं जाईल आयपीएलचं वेळापत्रक

यंदा आयपीएल आणि लोकसभा निवडणुका एकाच वेळी येत आहेत.

शैलेश मुसळे | Updated: Feb 13, 2019, 11:59 AM IST
लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर बनवलं जाईल आयपीएलचं वेळापत्रक title=

मुंबई : लोकसभा निवडणुका आणि आयपीएल एकाच वेळी येत असल्याने बीसीसीआयने अजून आयपीएलचं वेळापत्रक जाहीर केलेलं नाही. बीसीसीआयने म्हटलं की, ते निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची वाट बघत आहे. त्यानंतर आयपीएल 2019 च्या वेळापत्रकाची घोषणा केली जाणार आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटलं की, लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरच आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा केली जाईल.

याआधी अशी चर्चा होती की, आयपीएल 2019 ची घोषणा या आठवड्यात होऊ शकते. आयपीएल आणि निवडणुका एकाच वेळी येत असल्याने काही बदल होऊ शकतात. आतापर्यंत आयपीएलमध्ये सामने हे 'होम-अवे' फॉर्मेटमध्ये होत होते. म्हणजे ज्या संघामध्ये सामना आहे त्या संघाच्या होमग्राऊंडमध्ये सामना होत होता. त्यानंतर त्याच दोन संघामध्ये होणारा पुढचा सामना दुसऱ्या टीमच्या होम ग्राऊंडमध्ये होत होता. पण आता असं होणार नाही.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, 'निवडणुकीच्या तारखेची अजूनही घोषणा न झाल्याने आयपीएलचं वेळापत्रक जारी करण्यात उशीर होत आहे. निवडणुका असल्याने त्यानुसार वेळापत्रक ठरवावं लागेल. ज्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही. निवडणुकीसाठी कशी व्यवस्था असते हे सगळ्यांना माहित आहे आणि त्यालाच प्राथमिकता आहे.'

लोकसभा निवडणुकीमुळे 2009 मध्ये आयपीएलचं आयोजन दक्षिण आफ्रिकेमध्ये करण्यात आलं होतं. पण आता बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे की, आयपीएल भारताबाहेर होणार नाही.