IPL 2019: 'बंगळुरूची टीम कागदावरच वाघ'; माल्ल्याचा निशाणा

आयपीएलचा यंदाचा मोसमही विराट कोहलीच्या बंगळुरू टीमसाठी निराशाजनक राहिला

Updated: May 6, 2019, 09:44 PM IST
IPL 2019: 'बंगळुरूची टीम कागदावरच वाघ'; माल्ल्याचा निशाणा title=

मुंबई : आयपीएलचा यंदाचा मोसमही विराट कोहलीच्या बंगळुरू टीमसाठी निराशाजनक राहिला. पॉईंट्स टेबलमध्ये ११ पॉईंट्ससह बंगळुरूची टीम शेवटच्या म्हणजेच आठव्या क्रमांकावर राहिली. यंदाच्या मोसमात खेळलेल्या १४ मॅचपैकी फक्त ५ मॅचमध्ये बंगळुरूचा विजय झाला, तर ८ मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आणि एका मॅचचा निकाल लागला नाही. यंदाच्या मोसमात बंगळुरूचा सुरुवातीच्या लागोपाठ ६ मॅचमध्ये पराभव झाला. यानंतर पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये त्यांना पहिला विजय मिळवला.

बंगळुरू टीमचा माजी मालक विजय माल्ल्याने या कामगिरीनंतर टीमवर निशाणा साधला आहे. बंगळुरूची टीम ही फक्त कागदावरच वाघ आहे, अशी टीका माल्ल्याने केली आहे. बंगळुरूची टीम ही नेहमीच सर्वोत्तम असेत, पण कागदावर. यंदाच्या खराब कामगिरीमुळे निराश आहे, असं ट्विट माल्ल्याने केलं आहे. 

२००८ साली आयपीएलच्या टीम लिलावामध्ये विजय माल्ल्याने बंगळुरूच्या टीमला विकत घेतलं आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असं नाव टीमला दिलं. पहिल्याच मोसमातल्या खराब कामगिरीनंतर माल्ल्याने टीममध्ये बदल केले. यानंतर दोन वेळा बंगळुरूची टीम फायनलमध्ये पोहोचली, पण एकदाही त्यांना आयपीएल स्पर्धा जिंकता आली नाही.

२०१६ साली बंगळुरूच्या टीमने सर्वोत्तम कामगिरी केली होती. विराट कोहलीने त्या मोसमात तब्बल ९७३ रन केल्या होत्या. आयपीएलच्या एका मोसमातली ही सर्वाधिक धावसंख्या आहे. २०१६ साली बंगळुरूने फायनल गाठली होती, पण हैदराबादने त्यांचा पराभव केला. यानंतर २०१७ साली बंगळुरू आठव्या क्रमांकावर, २०१८ साली सहाव्या क्रमांकावर आणि २०१९ साली आठव्या क्रमांकावर राहिली.

भारतीय बँकांचं कर्ज बुडवून लंडनला पळालेल्या विजय माल्ल्याला आरसीबी व्यवस्थापनाने टीमचं कोणतंही पद भुषवण्यापासून डच्चू दिला. तसंच एफ-१ फोर्स इंडियाची मालकीही विजय माल्ल्याकडून गेली.

यंदाच्या मोसमात बंगळुरूची कामगिरी खराब झाली असली, तरी त्यांचा कर्णधार विराट कोहलीने पुढच्या वर्षी चांगली कामगिरी करण्याचं आश्वासन बंगळुरूच्या चाहत्यांना दिलं. तसंच त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये विराटने बंगळुरूची टीम, चाहते, सपोर्ट स्टाफ आणि ग्राऊंड स्टाफ यांचेही आभार मानले आहेत.