मुंबई : क्विंटन डिकॉकच्या संघर्षमय खेळीनंतर मुंबईने हैदराबादपुढे १६३ रनचं आव्हान ठेवलं आहे. या मॅचमध्ये मुंबईने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पण ओपनर रोहित शर्मा लवकर बाद झाला. १८ बॉलमध्ये २४ रन करणाऱ्या रोहितला खलील अहमदने माघारी धाडलं. क्विंटन डिकॉकने ५८ बॉलमध्ये नाबाद ६९ रनची खेळी केली. यामध्ये ६ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता. संपूर्ण २० ओव्हरपर्यंत बॅटिंग करणाऱ्या डिकॉकला फटकेबाजी करण्यात अपयश येत होतं. हैदराबादकडून खलील अहमदने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या, तर भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद नबीला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.
पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम १४ पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आणि हैदराबादची टीम १२ पॉईंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबई आणि हैदराबादच्या टीमनी प्रत्येकी १२-१२ मॅच खेळल्या आहेत. या मॅचमध्ये मुंबईचा विजय झाला तर ते प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवतील. १८ पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर असणारी चेन्नई आणि १६ पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर असणारी दिल्ली याआधीच प्ले ऑफमध्ये क्वालिफाय झाल्या आहेत. हैदराबादच्या टीमला मात्र प्ले ऑफमधलं आव्हान कायम ठेवण्यासाठी ही मॅच जिंकणं गरजेचं आहे.
आयपीएलमध्ये मुंबई आणि हैदराबादच्या टीममध्ये १३ मॅच झाल्या आहेत. यातल्या ७ मॅच हैदराबादने आणि ६ मॅच मुंबईने जिंकल्या आहेत. पण वानखेडेवर झालेल्या मॅचमध्ये मुंबईला ३ आणि हैदराबादला फक्त एकच मॅच जिंकता आली आहे.