टीम इंडियाच्या वर्ल्ड कप मोहिमेला धक्का, आयपीएल प्रशिक्षकांमुळे नुकसान होणार

३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे.

Updated: May 2, 2019, 09:18 PM IST
टीम इंडियाच्या वर्ल्ड कप मोहिमेला धक्का, आयपीएल प्रशिक्षकांमुळे नुकसान होणार title=

मुंबई : ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. पण आधीच भारतीय टीमच्या वर्ल्ड कप मोहिमेला धक्का बसला आहे. तो धक्का कोणत्या खेळाडूच्या दुखापतीच्या रुपात नव्हे तर संघाच्या रणनीतीच्या रुपात आहे. वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम इंडियाची रणनीतीच प्रतिस्पर्ध्यांच्या एकप्रकारे हाती लागत आहे.

सध्या भारतामध्ये एकीकडे आयपीएल सुरु आहे. या स्पर्धेदरम्यानच भारतीय खेळाडू वर्ल्ड कपसाठी आपआपली रणनिती आखत आहेत. मात्र हिच रणनिती थेट प्रतिस्पर्धी संघाच्या हाती लागत आहे. कारण याच आयपीएलमध्ये अनेक संघांनी परदेशी माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षकांची आपआपल्या संघाचे प्रशिक्षक किंवा सपोर्ट स्टाफमध्ये नेमणूक केली आहे.

शिखर धवन भारतीय क्रिकेट संघाचा सलामीचा महत्त्वाचा फलंदाज आहे. आयपीएलमध्ये तो ज्या दिल्ली संघाकडून खेळतो त्या संघाचा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग आहे. विशेष म्हणजे पॉन्टिंग ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाचा सहाय्यक प्रशिक्षकही आहे. याखेरीज श्रीराम सोमायाजुला जे श्रीलंकेचे सहाय्यक प्रशिक्षक आहेत ते दिल्ली संघाचे विश्लेषक म्हणून काम पाहत आहेत. यामुळे आपला सलामीवीर शिखर धवनचा पॉन्टिंग आणि श्रीराम या दोघांनीही नक्कीच बारिक अभ्यास केला असेल. त्याचा जमेच्या आणि कमकुवत बाबींची माहिती ते नक्कीच आपापल्या संघाला देतील यात शंक नाही.

तर दुसरीकडे प्रसन्ना अगोराम यांच्यावर दक्षिण आफ्रिकन संघाचे विश्लेषक म्हणून जबाबदारी असून ते सध्या पंजाब संघाच्या सपोर्ट स्फाटमध्ये आहेत. असे अनेक परदेशी माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक आहेत की जे आयपीएलमध्ये विविध संघांच्या दिमतीला आहेत. यामुळे आपल्या जवळपास सर्वच खेळाडूंची माहिती आणि त्यांची रणनिती ही आपसूकच प्रतिस्पर्धी संघांला नक्कीच कळत असणार.

एकीकडे सचिन, गांगुली, द्रविड आणि लक्ष्मणसारखे दिग्गज खेळाडूंवर बीसीसीआय हितसंबंधांच्या मुद्द्यावरुन त्यांना धारेवर धरत आहेत. तर दुसरीकडे अशाप्रकारे परदेशी माजी क्रिकेटूंबाबत मात्र बीसीसीआय काहीच कारवाई करताना दिसत नाही. यामुळे भारतीय क्रिकेटविश्वात एकप्रकारे नाराजीचा सूर आहे. आयपीएलमधून खेळाडू, माजी खेळाडू आणि बीसीसीआयला अमाप पैसा मिळतो हे खरं. पण त्यासाठी देशाच्या राष्ट्रीय संघाचं नुकसान होणार नाही, याचीही खबरदारी घेतली पाहिजे.