मुंबई : आयपीएलच्या १२व्या मोसमात मुंबईच्या खेळाडूंना खुशखबर मिळाली आहे. खेळाडूंनी पुढचे ४ दिवस आराम करायला सांगितला आहे. मुंबईचा पुढचा सामना आता थेट शुक्रवारी २६ एप्रिलला चेन्नईविरुद्ध होणार आहे. याआधी मुंबई शनिवारी राजस्थानविरुद्ध खेळली होती. या सामन्यात त्यांचा ५ विकेटने पराभव झाला होता. या मॅचनंतर आता मुंबईचा सामना सहा दिवसानंतर होणार आहे.
मुंबईच्या खेळाडूंना आराम मिळावा, तसंच आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवता यावा यासाठी मुंबईच्या टीमने खेळाडूंना ४ दिवस विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएल संपल्यानंतर लगेचच वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. वर्ल्ड कपचं महत्त्व लक्षात घेता खेळाडूंना आयपीएलदरम्यान शारिरिक ताण कमी करण्याचा निर्णय स्वत: घ्यावा, असं वक्तव्य आयपीएलआधी भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीने केलं होतं. मुंबईच्या टीममधले रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह या वर्ल्ड कपमध्ये भारताकडून खेळतील.
खेळाडूंना देण्यात आलेल्या विश्रांतीबद्दल मुंबईच्या टीममधल्या सूत्राला विचारण्यात आलं. 'खेळाडू आमची प्राथमिकता आहे. यासाठी त्यांना बॅट आणि बॉलपासून लांब राहायला सांगण्यात आलं आहे. फक्त रोहित, हार्दिक आणि बुमराहच नाही तर क्विंटन डिकॉक, लसिथ मलिंगा यांच्यासारखे अन्य खेळा़डूही त्यांच्या देशाकडून वर्ल्ड कप खेळणार आहेत. सगळ्या खेळाडूंना वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करता यावी, याची काळजी आम्ही घेत आहोत. बहुतेक परदेशी खेळाडू चेन्नईला जाऊन सुट्टीचा आनंद लुटत आहेत, तर भारतीय खेळाडू स्वत:च्या घरी कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत,' असं मुंबई टीमच्या सूत्रांनी सांगितलं.