IPL 2019: पिंपरी-चिंचवडचा ऋतुराज धोनीच्या टीममधून खेळणार!

आयपीएलमध्ये खेळणं हे प्रत्येकाचे स्वप्न असतं.

Updated: Dec 20, 2018, 11:25 PM IST
IPL 2019: पिंपरी-चिंचवडचा ऋतुराज धोनीच्या टीममधून खेळणार! title=

पिंपरी-चिंचवड : आयपीएलमध्ये खेळणं हे प्रत्येकाचे स्वप्न असतं. पिंपरी चिंचवडच्या ऋतुराज गायकवाडचं हे स्वप्न पूर्ण झालंय. ऋतुराजची धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघात निवड झालीय. चेन्नईच्या टीमनं विकत घेतल्यामुळे ऋतुराजवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. पिंपरी चिंचवडमधून आयपीएल मध्ये निवड झालेला तो पहिला खेळाडू आहे. ऋतुराज गायकवाडला चेन्नईनं २० लाख रुपयांच्या बेस प्राईजवर विकत घेतलं. ऋतुराजशिवाय चेन्नईच्या टीमनं मोहित शर्मावर ५ कोटी रुपयांची बोली लावली. आयपीएलच्या संपूर्ण लिलावामध्ये चेन्नईनं फक्त हे दोनच खेळाडू विकत घेतले.

मंगळवारी १८ डिसेंबरला जयपूरमध्ये आयपीएलचा लिलाव झाला. आयपीएलच्या लिलावासाठी जवळपास १००३ खेळाडूंनी अर्ज केले होते. पण आयपीएलच्या सगळ्या ८ टीमनी यातल्या ३४६ खेळाडूंची यादी निवडली. लिलावामध्ये मात्र या सगळ्या खेळाडूंवर बोली लागली नाही. यातल्या काही खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला, तर अनेक खेळाडूंच्या पदरी निराशा आली.

नवोदितांनाच लिलावात पसंती

जयदेव उनाडकट आणि वरुण चक्रवर्थी या दोघांना सर्वाधिक किंमत मिळाली. मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही जयदेव उनाडकट महागडा खेळाडू ठरला आहे. उनाडकटला राजस्थाननं ८.४० कोटी रुपयांना विकत घेतलं. मागच्या वर्षीही राजस्थानच्या टीमनंचं उनाडकटला ११.५ कोटी रुपयांना विकत घेतलं होतं.

या लिलावातली सगळ्यात धक्कादायक बोली वरुण चक्रवर्तीवर लागली. टीएनपीएलमध्ये खेळलेल्या वरुण चक्रवर्तीला पंजाबच्या टीमनं ८.४० कोटी रुपयांना विकत घेतलं. वरुण चक्रवर्तीची बेस प्राईज २० लाख रुपये होती. मिस्ट्री स्पिनर म्हणून ओळख असणाऱ्या वरुण चक्रवर्ती वेगवेगळ्या प्रकारचे ७ बॉल टाकू शकतो.

दिग्गजांना धक्का

आयपीएलच्या लिलावामध्ये नवोदित खेळाडू कोट्यधीश होत असतानाच दिग्गज खेळाडूंना मात्र मोठा धक्का बसला. आयपीएल लिलावाच्या सुरुवातीच्या सत्रामध्ये युवराज सिंग आणि लसिथ मलिंगा या दोघांवर कोणीच बोली लावली नाही, त्यामुळे ते विकले गेले नव्हते. अखेर शेवटच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा या दोघांवर बोली लावण्यात आली, अखेर मुंबईच्या टीमनं या दोघांना टीममध्ये घेतलं. युवराज सिंगला त्याची बेस प्राईज १ कोटी आणि मलिंगाला त्याची बेस प्राईज २ कोटी रुपयांना मुंबईनं विकत घेतलं. 

आयपीएलमध्ये लिलाव झालेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी