मुंबई : वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात चौथ्या स्थानासाठी चांगलीच चुरस होती. यासाठी अंबाती रायुडू आणि विजय शंकर यांच्यापैकी कोणाची निवड करायची ही निवड समितीसमोरची डोकेदुखी होती. निवड समितीनं मात्र विजय शंकरला अनेक भूमिका बजावू शकतो असं कारण देत प्राधान्य दिलं आणि अंबाती रायुडूचा पत्ता कट झाला. यावर अंबाती रायुडूनंही ट्विटरद्वारे आपली नाराजी व्यक्त केली होती.
वर्ल्ड कपच्या एका स्थानासाठी झगडणाऱ्या अंबाती रायुडू आणि विजय शंकर यांच्यात यंदाच्या आयपीएलमध्ये अजब योगायोग पाहायला मिळाला. यामुळे क्रिकेटप्रेमी तर चकित झालेच आहेत मात्र निवड समितीलाही आपण रायुडूवर खरंच अन्याय तर केला नाही ना असं नक्कीच वाटलं असेल.
चेन्नईकडून खेळणाऱ्या अंबाती रायुडूने आयपीएलच्या १४ मॅचमध्ये १९.९ च्या सरासरीने २१९ रन केल्या आहेत. तर हैदराबादच्या विजय शंकर यानेही १४ मॅचमध्ये १९.९च्या सरासरीने २१९ रनच केल्या आहेत. विजय शंकरला एक विकेट घेण्यात यश आलं आहे.