मुंबई : आयपीएलच्या १२व्या मोसमासाठीचा लिलाव जयपूरमध्ये पार पडला. या लिलावानंतर अनेक टीमचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. यंदाच्या वर्षी आयपीएलच्या ८ टीमनी एकूण ६० खेळाडूंवर बोली लावली. यातले सर्वाधिक १३ खेळाडू पंजाबच्या टीमनं विकत घेतले. म्हणजेच यावेळी पंजाबची टीम जेव्हा मैदानात उतरेल तेव्हा अर्धी टीम नवीन असेल.
बॉलीवूड अभिनेत्री प्रिती झिंटा मालक असलेल्या पंजाबच्या टीमनं लिलावाआधी मागच्यावर्षी त्यांच्या टीममध्ये असलेले ११ खेळाडू सोडून दिले. युवराज सिंग, एरॉन फिंच, अक्षर पटेल, मोहित शर्मा, बरिंदर श्रन, बेन द्वारशूस, मनोज तिवारी, अक्षदीप नाथ, प्रदीप साहू, मयंक डागर आणि मंजूर डार या खेळाडूंना पंजाबनं बाहेरचा रस्ता दाखवला. तर मार्कस स्टॉयनीसला पंजाबनं बंगळुरूला ट्रान्सफर केलं. स्टॉयनीसच्या बदल्यात पंजाबनं मंदीप सिंगला टीममध्ये घेतलं. यानंतर पंजाबच्या टीममध्ये रवीचंद्रन अश्विन, केएल राहुल, क्रिस गेल, एन्ड्रयू टाय, मयंक अग्रवाल, अंकित राजपूत, मुजीब उर रहमान, करुण नायर हे खेळाडू उरले होते.
११ खेळाडू सोडल्यानंतर पंजाबनं लिलावात सर्वाधिक १३ खेळाडू विकत घेतले. वरुण चक्रवर्ती, सॅम कुरन, मोहम्मद शमी, प्रभू सिमरन सिंग, निकोलस पूरन, मोयसेस हेनरीक्स, हरदूस विलजॉन, दर्शन नाळकंडे, सरफराज खान, अर्शदीप सिंग, अग्निवेश अयाची, हरप्रीत ब्रार, मुरुगन अश्विन या खेळाडूंचा पंजाबनं टीममध्ये समावेश केला.
आयपीएलच्या या लिलावामध्ये वरुण चक्रवर्ती हा सगळ्यात महागडा खेळाडू ठरला. पंजाबनं त्याला ८.४० कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. तर इंग्लंडचा ऑलराऊंडर सॅम कुरन हा सगळ्यात महागडा परदेशी खेळाडू आहे. त्याच्यावरही पंजाबनंच बोली लावली. सॅम कुरनला पंजाबनं ७.२० कोटी रुपयांना विकत घेतलं.
आयपीएलच्या मागच्या मोसमात वीरेंद्र सेहवाग पंजाबच्या टीमचा प्रशिक्षक होता. यावर्षी मात्र प्रिती झिंटानं सेहवागऐवजी न्यूझीलंडच्या मायकल हेसनची नियुक्ती केली आहे.
ख्रिस गेल, डेव्हिड मिलर, करुण नायर, मयंक अग्रवाल, केएल राहुल, आर अश्विन, अंकित राजपूत, अँड्र्यू टाय, मुजीब उर रहमान, वरुण चक्रवर्ती, सॅम कुरन, मोहम्मद शमी, प्रभू सिमरन सिंग, निकोलस पूरन, मोयसेस हेनरीक्स, हरदूस विलजॉन, दर्शन नाळकंडे, सरफराज खान, अर्शदीप सिंग, अग्निवेश अयाची, हरप्रीत ब्रार, मुरुगन अश्विन