IPL 2020 : 'त्या' चुकीमुळं विराटला तब्बल १२ लाखांचा दंड

असं नेमकं झालं तरी काय?

Updated: Sep 25, 2020, 11:33 AM IST
IPL 2020 : 'त्या' चुकीमुळं विराटला तब्बल १२ लाखांचा दंड  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : यंदाच्या वर्षी आयपीएलचे सामने भारतात होत नसले, तरीही या सामन्यांना मिळणारी क्रीडा रसिकांची लोकप्रियता मात्र तसूभरही कमी झालेली नाही. अशाच उत्साही वातावरणात दररोज आयपीएलचे सामने पार पडत आहेत. सोशल मीडियावरही याचे पडसाद पाहायला मिळत आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात गुरुवारी पार पडलेल्या पंजाब विरुद्ध बंगळुरूच्या सामन्यात विराट कोहलीला अनेकांच्या रोषाचा सामना करावा लागला. 

इतकंच नव्हे, तर त्याला याचा फटका आर्थिक स्वरुपातही बसला. सामन्यादरम्यान 'स्लो ओवर रेट'साठी त्याला तब्बल १२ लाख रुपयांचा दंड लावण्यात आल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलं. 

'बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली याला IPL 2020 मधील पंजाबविरोधातील सामन्यात त्याच्या संघाच्या स्लो ओवर रेटसाठी  दंड लावण्यात येत आहे', अशी माहिती लीगकडून जाहीर करण्यात आलेल्या पत्रकातून देण्यात आली. याअंतर्गत दंडाची रक्कमही स्पष्ट करण्यात आली होती. 

 

गुरुवारी झालेल्या आयपीएलच्या सामन्यात पंजाबच्या संघानं प्रथम फलंजादी करत बंगळुरूपुढं २०७ धावांचं आव्हान उभं केलं. पण, या धावांचा पाठलाग करताना विराटचा संघ मात्र सपशेल अपयशी ठरला. पंजाबच्या संघानं हा सामना तब्बल ९७ धावांनी खिशात टाकला. पंजाबच्या संघाचा कर्णधार के.एल. राहुल याची धमाकेदार शतकी खेळी या सामन्यात आकर्षणाचा विषय ठरली.