INDvsAUS: 'विहारीसोबत मयंक ओपनिंगला, अपयशी ठरले तरी संधी देऊ'

भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या तिसऱ्या टेस्टला बुधवार २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

Updated: Dec 25, 2018, 04:26 PM IST
INDvsAUS: 'विहारीसोबत मयंक ओपनिंगला, अपयशी ठरले तरी संधी देऊ' title=

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या तिसऱ्या टेस्टला बुधवार २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मॅचसाठी भारतानं टीममध्ये मोठे बदल केले आहेत. या मॅचमध्ये अपयशी ठरलेल्या ओपनर केएल राहुल आणि मुरली विजय यांना डच्चू देण्यात आलाय. या दोघांच्याऐवजी मयंक अग्रवाल आणि रोहित शर्माला संधी देण्यात आली आहे. तर उमेश यादवऐवजी रवींद्र जडेजाचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे. या टेस्ट मॅचमध्ये हनुमा विहारी आणि मयंक अग्रवाल ओपनिंगला येतील, असं भारतीय निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी सांगितलं.

पृथ्वी शॉला दुखापत झाल्यामुळे तो टीममध्ये नाही. त्यामुळे हनुमा विहारी पुढच्या २ टेस्ट मॅचमध्येच भारताकडून ओपनिंगला येईल. या २ टेस्टमध्ये तो अपयशी ठरला तर पुन्हा त्याल्या मधल्या फळीत संधी दिली जाईल, असा विश्वास एमएसके प्रसाद यांनी व्यक्त केला आहे. हनुमा विहारीनं आत्तापर्यंत २ टेस्ट मॅचच खेळल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही विहारी नियमित ओपनर म्हणून खेळत नाही. हनुमा विहारीकडे कुकाबुरा बॉलनी खेळायचं चांगलं तंत्र असल्याचं, एमएसके प्रसाद म्हणाले. तसंच विहारी हा मोठ्या कालावधीसाठी ओपनिंगसाठीचा पर्याय नाही, असंही प्रसाद यांनी स्पष्ट केलं.

प्रसाद यांनाही मिळाली होती अशीच जबाबदारी

हनुमा विहारीप्रमाणेच १९९९ सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये एमएसके प्रसाद यांना अशीच जबाबदारी मिळाली होती. पण त्यांना ब्रेट लीच्या फास्ट बॉलिंगचा सामना करता आला नाही. १९९९ सालच्या दौऱ्यामध्ये मला संधी मिळाली, पण मला याचा फायदा घेता आला नाही. हनुमा विहारीनं मात्र या संधीचं सोनं करावं, अशी प्रतिक्रिया प्रसाद यांनी दिली. रोहित शर्माऐवजी हनुमा विहारी ही भूमिका बजावण्यासाठी सक्षम आहे, असं आम्हाला वाटत असल्याचं प्रसाद म्हणाले. हनुमा विहारीच्या तंत्रशुद्ध बॅटिंगमुळे तो जास्त काळ भारताकडून खेळेल, असा विश्वास प्रसाद यांनी व्यक्त केला.

एमएसके प्रसाद यांच्याकडून मयंकचंही कौतुक

मयंक अग्रवालनं भारत ए कडून चांगलं प्रदर्शन केल्याचा त्याला फायदा झाल्याचं प्रसाद म्हणाले. वारंवार अपयशी ठरत असलेल्या राहुल आणि विजयच्या भविष्याबाबात विचार करण्यात येईल, असं मत एमएसके प्रसाद यांनी व्यक्त केलं. दोन्ही ओपनरनी आमच्या अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नसल्यानं आम्ही निराश झालो आहोत. पुढची टेस्ट सीरिज ७ महिन्यानंतर आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत नंतर विचार करता येईल, अशी प्रतिक्रिया प्रसाद यांनी दिली.