म्हणून रोहित-अश्विन दुसऱ्या टेस्टमधून बाहेर, बीसीसीआयकडून स्पष्टीकरण

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचला शुक्रवार १४ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

Updated: Dec 13, 2018, 04:35 PM IST
म्हणून रोहित-अश्विन दुसऱ्या टेस्टमधून बाहेर, बीसीसीआयकडून स्पष्टीकरण title=

पर्थ : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचला शुक्रवार १४ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या टेस्ट मॅचसाठी भारतानं १३ सदस्यांच्या टीमची घोषणा केली आहे. १३ सदस्यांमध्ये स्पिनर रवीचंद्रन अश्विन आणि बॅट्समन रोहित शर्माला संधी देण्यात आलेली नाही. भारताचा ओपनर पृथ्वी शॉला झालेल्या दुखापतीनंतर भारताला हे दोन मोठे धक्के लागले आहेत. शॉ, अश्विन आणि रोहित उपलब्ध नसल्यामुळे पहिल्या १३ जणांच्या टीममध्ये हनुमा विहारी, रवींद्र जडेजा, उमेश यादव आणि भुवनेश्वर कुमारचा समावेश करण्यात आला आहे.

पहिल्या टेस्ट मॅचदरम्यान अश्विनच्या पोटाच्या मांसपेशींना दुखापत झाली होती. तर रोहित शर्माच्या पाठीला दुखापत झाली आहे. ऍडलेडमधल्या पहिल्या टेस्टआधी झालेल्या सराव सामन्यामध्ये पृथ्वी शॉच्या पावलाला दुखापत झाली होती. त्यामुळे शॉ पहिल्या टेस्टलाही मुकला होता.

पृथ्वी शॉच्या उजव्या पायाच्या पावलाला दुखापत झाली आहे. पृथ्वी शॉची दुखापत अजूनही बरी झालेली नसली तरी तो प्रगती करत आहे, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. तर अश्विन आणि रोहित शर्मावरही सध्या उपचार सुरु आहेत. त्यामुळे ते दुसरी टेस्ट खेळणार नाही. तिसऱ्या टेस्टमध्ये हे तिन्ही खेळाडू फिट होतील का नाही याबाबत सध्या निर्णय घेण्यात आलेला नाही. पण योग्यवेळी याबाबत निर्णय घेऊ, असं बीसीसीआयनं सांगितलं.

दुसऱ्या टेस्टसाठी भारतीय टीम

विराट कोहली(कर्णधार), मुरली विजय, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव

नवीन मैदानातली खेळपट्टीही जलद

पर्थमध्ये होणारा हा सामना नव्या ऑप्टिस स्टेडियमवर होणार आहे. आत्तापर्यंत या स्टेडियमवर दोन आंतरराष्ट्रीय मॅच झाल्या असल्या तरी, ही पहिलीच टेस्ट असेल. एकही टेस्ट न झाल्यामुळे ही खेळपट्टी कशी असेल याबद्दल अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे या पिचवर टॉस हा जुगार ठरू शकतो, अशात टॉस जिंकून बॅटिंग घ्यायची का बॉलिंग, तसंच कोणत्या खेळाडूंचा टीममध्ये समावेश करायचा हा निर्णय घेणं कर्णधारांसाठी डोकेदुखी ठरू शकतो. पिच क्युरेटरनी सांगितल्याप्रमाणे ही खेळपट्टी पर्थचं याआधीचं मैदाना असलेल्या वाका प्रमाणेच जलद असेल. वाकाची खेळपट्टी ही जगातली सगळ्यात जलद खेळपट्टी मानली जाते.  

पहिल्या टेस्टमध्ये भारताचा विजय 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा ३१ रननी विजय झाला होता. या विजयामुळे ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारत १-०नं आघाडीवर आहे. चेतेश्वर पुजारानं पहिल्या इनिंगमध्ये शतक आणि दुसऱ्या इनिंगमध्ये अर्धशतक करत भारताच्या विजयात मोलाचं योगदान दिलं होतं. दुसऱ्या टेस्टमध्येही पुजारा आपला फॉर्म कायम ठेवेल, अशी अपेक्षा भारतीय टीमला असेल. तसंच पहिल्या टेस्टमध्ये अपयशी ठरलेल्या विराट कोहलीला या मॅचमध्ये मोठी खेळी करण्याचं आव्हान असेल.