तिरुवनंतपुरम : भारतीय क्रिकेट टीमचा विमानतळावरचा एक फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये मुंबई विमानतळावर भारतीय खेळाडू लोकप्रिय मल्टीप्लेयर गेम खेळताना दिसत आहेत. मंगळवारी बीसीसीआयनं एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये विमानाची वाट पाहत बसलेले भारतीय खेळाडू मल्टीप्लेयर गेम खेळताना दिसत आहेत. हे सगळे खेळाडू PUBG हा लोकप्रिय ऑनलाईन गेम खेळत होते, असं बोललं जातंय.
सोशल नेटवर्किंगवरून या फोटोवर मजेदार प्रतिक्रिया येत आहेत. पण जसप्रीत बुमराहबद्दल आलेल्या प्रतिक्रिया सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. सगळे खेळाडू मोबाईल आणि टॅबमध्ये डोकं घालून बसलेले असताना बुमराह मात्र हा गेम खेळत नाहीये. बुमराहच्या मोबाईलची बॅटरी संपली असेल, किंवा बुमराहचा खेळाडू सुरुवातीलाच मारला गेला असेल, अशा प्रतिक्रिया आल्या आहेत.
१ नोव्हेंबरला भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये वनडे सीरिजची शेवटची आणि पाचवी वनडे खेळवण्यात येणार आहे. त्याआधी तिरुवनंतपुरममधल्या हॉटेलमध्ये भारतीय टीमचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं.
बीसीसीआयनं भारतीय टीमच्या सरावाचे फोटोही ट्विट केले आहेत.
भारत वेस्ट इंडिज वनडे सीरिजमध्ये भारत २-१नं आघाडीवर आहे. या सीरिजमधली १ वनडे टाय झाली होती. त्यामुळे तिरुवनंतपुरमची मॅच जिंकून सीरिज खिशात टाकण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरेल.