विराट कोहलीचा रेकॉर्डब्रेक सामना, महान खेळाडूंच्या यादीत मिळवणार स्थान; माजी खेळाडूंकडून सॅल्यूट

Virat Kohli to Play 500th Match: भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) गुरुवारी वेस्ट इंडिजविरोधात खेळण्यासाठी मैदानात उतरताच एक नवा रेकॉर्ड आपल्या नावे करणार आहे. याचं कारण हा विराट कोहलीचा 500 वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो चौथी खेळाडू ठरणार आहे.  

शिवराज यादव | Updated: Jul 20, 2023, 06:47 PM IST
विराट कोहलीचा रेकॉर्डब्रेक सामना, महान खेळाडूंच्या यादीत मिळवणार स्थान; माजी खेळाडूंकडून सॅल्यूट title=

Virat Kohli to Play 500th Match: भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावे जागतिक क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड नोंद आहेत. दरम्यान भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असून दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली आणखी एका रेकॉर्डला गवसणी घालणार आहे. विराट कोहली मैदानात उतरताच हा रेकॉर्ड होणार आहे. याचं कारण हा विराट कोहलीचा 500 वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो चौथी खेळाडू ठरणार आहे. त्रिनिनाद (Trinidad) येथील क्वीन्स पार्क ओव्हल (Queen’s Park Oval) मैदानात हा सामना होणार आहे. 

भारतीय क्रिकेटमध्य़े आतापर्यंत फक्त तीनच खेळाडू 500 किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. सचिन तेंडुलकर या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकरने 1989 मध्ये वयाच्या 16 व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून ते निवृत्ती घेईपर्यंत सचिनने 664 सामने खेळले. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर 538 सामन्यांसह धोनी आणि तिसऱ्या क्रमांकावर भारतीय संघाचा सध्याचा प्रशिक्षक राहुल द्रविड आहे. राहुल द्रविडने 509 सामने खेळले आहेत. या तिघांनंतर आता विराट कोहली चौथ्या क्रमांकाचा खेळाडू ठरणार आहे. 

दरम्यान, विराट कोहलीच्या या रेकॉर्डच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने विशेष पोस्ट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. बीसीसीआयने ट्वीटरच्या माध्यमातून त्याला शुभेच्छा दिलं असून पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "प्रवासाची स्तुती करण्याची 500 कारणं, 500 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी विराट कोहलीला शुभेच्छा".

दुसरीकडे भारताच्या अनेक माजी खेळाडूंनीही विराट कोहलीचं कौतुक केलं आहे. आकाश चोप्रा, प्रज्ञान ओझा, वसीम जाफर यांनी विराट कोहलीच्या प्रवासाचं कौतुक केलं आहे. "विराट कोहलीचे खेळाप्रती असलेले समर्पण अतिशय स्पष्ट आहे आणि खरे तर त्याची ओळख सांगतं. एखाद्या साधूप्रमाणे त्याने जीवन जगत फक्त क्रिकेटचाच विचार केला. यामुळे आज त्याने हे यश मिळवलं असून, या सुंदर खेळाचा ब्रॅण्ड अॅम्बेसिडर ठरला आहे. भारतीय क्रिकेटमध्ये त्याने दिलेल्या योगदानाबद्दल आम्ही त्याचे आभारी आहोत," असं आकाश चोप्राने म्हटलं आहे.

तर प्रज्ञान ओझाने हे फार सुंदर यश असल्याचं म्हटलं आहे. फार कमी लोकांना हे यश मिळवण्याची संध मिळते. यातून त्याला प्रेरणा मिळेल आणि देशासाठी चांगली खेळी करत राहील आशा त्याने व्यक्त केली आहे. 

"प्रत्येकाला 500 सामना खेळण्याची संधी मिळत नाही. ज्याप्रकारे त्याने स्वत:ला फिट ठेवलं आहे आणि 75 शतकं ठोकली आहेत ते कौतुकास पात्र आहे. यातून त्याची शिस्तबद्धता, समर्पण दिसतं. त्याने 500 सामने खेळले असून, अजून क्रिकेट शिल्लक आहे. जगभरातील खेळाडूंसाठी तो एक आदर्श आहे," अशा भावना वसीम जाफरने व्यक्त केल्या आहेत.