गंभीर आरोपांनंतर 'या' क्रिकेटरकडून आत्महत्येचा प्रयत्न?

त्या एका वळणामुळे त्याचं आयुष्यच बदलून गेलं आणि.... 

Updated: Nov 27, 2018, 11:31 AM IST
गंभीर आरोपांनंतर 'या' क्रिकेटरकडून आत्महत्येचा प्रयत्न?  title=

मुंबई : क्रिकेट जगतात धावा, खेळाडू, विजय, पराजय यासोबतच आणखी एक शब्दही आपल्या कानांवर पडतो. तो शब्द म्हणजे मॅच फिक्सिंग. एखाद्या क्रिकेटपटूच्या कारकिर्दीला अडचणीत आणणाऱ्या मॅच फिक्सिंगच्या विळख्यात भारतीय क्रिकेटपटू श्रीसंथही अडकला होता. ज्याचे पडसाद त्याच्या पुढील करिअरवरही झाल्याचं पाहायला मिळालं. 

सध्याच्या घडीला तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर असला तरीही एका वेगळ्या मार्गाने मात्र तो चाहत्यांच्या भेटीला येतच आहे. तो मार्ग म्हणजे 'बिग बॉस' हा रिअॅलिटी शो. श्रीसंथ या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला असून, नुकतच त्याने या घरात मॅच फिक्सिंगच्या प्रकरणाच्या आठवणींविषयी वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं. 

बिग बॉसच्या एका भागात श्रीसंथने इतर स्पर्धकांशी संवाद साधतेवेळी या गोष्टीविषयी वाच्यता केल्याचं कळत आहे. मुख्य म्हणजे यावेळी त्याच्या भावनांचा बांधही फुटला होता. 

Sreesanth

मॅच फिक्सिंगमध्ये आपण निर्दोष असल्याचंच सांगत त्याने हा अतिशय वाईट आणि हादरवून टाकणारा प्रसंग होता, असं त्याने या कार्यक्रमादरम्यान सांगितलं. करिअरमध्ये आलेल्या या एका वळणाने सारी गणितच बदलली असं म्हणत आपण आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केल्याचा खळबळजनक खुलासा त्याच्याकडून करण्यात आला. ज्यामुळे इतर  सेलिब्रिटी स्पर्धकांच्याही भुवया उंचावल्या. 

२०१३ मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणी श्रीसंथवर गंभीर आरोप करण्यात आले होते. तेव्हापासून तो क्रिकेटच्या मैदानापासून दूरच होता. सध्याच्या घडीला त्याच्यावरील हे आरोप पुसण्यात आले असले तरीही त्याच्यावर बीसीसीआयकडून घालण्यात आलेली आजीवन बंदी मात्र कायम आहे. त्यामुळे या एका गोष्टीचा सामना करणं त्याच्यासाठी तितकच कठिण आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.